औरंगाबाद: जे मजूर परराज्यात गेले आहेत, ते फक्त एक पिवशी आणि कपडे घेऊन गेले आहेत. ते कायमस्वरुपी गेलेले नाहीत. मात्र ते परत येतील त्या वेळी त्यांची नोंदणी करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
परराज्यात गेलेल्या मजुरांवरून गेले काही दिवस उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात वाक्युद्ध रंगलेले आहे. याबाबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापुढे महाराष्ट्राला आमचे मजूर हवे असतील तर त्यांनी आमच्याकडे मागणी नोंदवावी अशीही टीका केली होती. यावर राज ठाकरे यांनीही परप्रांतातून येणाऱ्या मजुरांची यापुढे महाराष्ट्र सरकराने नोंदी ठेवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी आज परराज्यात गेलेले मजूर परत येताना त्यांच्या नोंदी करणार असल्याचे जाहीर केल्याने त्यास महत्त्व आहे.
देसाई म्हणाले, की परराज्यातील मजूर हे कायमस्वरूपी गेलेले नाहीत. जसजसे उद्योग सुरू होतील तसे ते परततील. ते आता परत आल्यावर त्यांच्या नोंदी केल्या जातील. सध्या राज्यात ५२ हजार ८७६ उद्योग सुरू झाले असून त्यात १३ लाख ५५ हजार कामगार कामावर परतले आहेत. हे सर्व उद्योग राज्यातील मनुष्यबळावर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 31, 2020 3:32 am