औरंगाबाद : गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतक ऱ्यांवर औरंगाबाद येथील क्रांती चौकात शुक्रवारी दुपारी रास्ता रोको करण्यासाठी बसले असताना पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करण्यात आला.

न्यायालयाच्या आदेशानंतर कारखान्याकडून अनामत रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपचे आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्हे रद्द करावेत व ज्या शेतकऱ्यांची बँक खाती गोठवण्यात आली ती तत्काळ खुली करावित, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकातील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्यासमोर आंदोलन करण्यासाठी सुमारे चारशे ते पाचशे शेतकरी सभासद गंगापूर तालुक्यातून दाखल झाले होते. यावेळी भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य वालतुरे गुरुजी आदीही आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळी ११ पासून शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आमदार बंब यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी २ च्या सुमारास प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी आले. या वेळी मागण्यांबाबत पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयामध्ये बैठक सुरू असून तेथे जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकरी सभासदांसमोर येऊन सांगितले. मात्र, आत्ताच आम्हाला मागण्यांवरील निर्णय कळवावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. आयुक्त कार्यालयाचा निर्णय येईपर्यंत संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सभासद क्रांती चौकात आले व तेथे रास्ता रोको करत ठिय्या मांडला. या वेळी आंदोलकांना रस्त्यातून बाजूला हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीहल्ला केला. संतोष जाधव यांच्यासह शेतकरी सभासद व इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनातून ठाण्यात नेले. लाठीहल्ल्यामुळे पांगलेल्या काही शेतकरी सभासदांना शोधून लाठय़ा मारत पोलिसांच्या वाहनात बसवून नेले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे, कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांत बंब यांच्या आवाहनानुसार तालुक्यातील शेतकरी, सभासद, ऊस उत्पादकांनी १ कोटी व सामोपचार योजनेत समविष्ट होण्यासाठी १.७१ कोटी रुपये भरले होते. न्यायालयीन लढाईनंतर कारखाना बेकायदेशीर विक्री व्यवहार न्यायालयाने रद्द ठरविला. ज्यांनी पैसे भरले त्यांच्या अनामत रकमा परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू होती. मात्र, आमदार बंब यांच्याविरोधातील खोटय़ा तक्रारीमुळे १२०० लोकांचे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया थांबवून शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवण्यात आले. कृष्णा पाटील डोणगावकर यांनी राजकीय दबाव वापरून गैरव्यवहार होत असल्याची तक्रार केल्यामुळे शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवण्यात आले.

लाठीहल्ला होताच आमदार बंब दाखल

शेतकरी सभासदांवर लाठीहल्ला होताच क्रांती चौकात भाजपचे आमदार प्रशांत बंब हे दाखल झाले. पोलीस निरीक्षक डॉ. जी. एस. दराडे, संभाजी पवार, देवकर यांना त्यांनी लाठीहल्ल्याचे कारण विचारले. शेतक ऱ्यांनी ऊद्रेक केला का, असा प्रश्न आमदार बंब यांनी उपस्थित केला. लोकशाही पद्धतीने केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बंब यांनी केला. शेतकरी सभासदांचे निवेदन तीन तास कोणी घेण्यासाठी येत नसतील तर उद्रेक वाढणार नाही तर काय, असे म्हणत आमदार बंब यांनी आंदोलकांच्या भूमिकेचे समर्थन केले.