लष्करात नोकरीला लावतो, म्हणून सात जणांकडून प्रत्येकी ५ लाख रुपये उकळणाऱ्या तिघांविरोधात सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान शेख अयुब याने बनावट नियुक्तीपत्र दिले. तसेच काही तरुणांना पुणे येथील लष्करी रुग्णालयाची भेटही घडवून आणली. तेथील अधिकारी ओळखीचा आहे, असे सांगून तिघांनी लुटल्याची फिर्याद योगेश्वर हंडे यांनी दिली. सात जणांना फसविल्याच्या या तक्रारीमुळे पोलिसांनी तपासाला वेग दिला असून मराठवाडय़ातील २० जणांची अशी फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणात दोन संशयित व महिलाही सहभागी असल्याचे तक्रारदारांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सांगितले. योगेश्वर हंडे, सोपान हंडे, योगेश थत्ते, योगेश शिरसाट, राजू डावंगे, नकुल नवरे, मंगेश भोगे यांची फसवणूक झाली. लष्करात नोकरी लावतो, असे म्हणून झालेल्या या व्यवहारात शेख अयुब याने बनावट पत्र दिले असल्याने त्याच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेख अयुब सैन्यात नोकरीत होता, असेही सांगितले जाते.