मुंबईच्या अधिकाऱ्यांचा दुष्काळग्रस्तांना दिलासा

मांजरा नदीच्या पुनरुज्जीवन कामासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लातुरात येऊन जलयुक्त लातूरचे मार्गदर्शक डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे १ लाख ३० हजार ७२४ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

यात मुंबईचे मोहनराव कोळी, नागपूरचे विक्रांत जुगादे, मूळचे लातूरचे पण मुंबई कार्यालयात कार्यरत असलेले महेश देशपांडे, मुंबईचे अमित िशदे, बंडू आर्वीकर आदींनी लातुरात येऊन साई व नागझरी बंधाऱ्यावर होत असलेल्या कामाची पाहणी केली. दुष्काळग्रस्त परिसरातील एखादे गाव दत्तक घेण्याची या अधिकाऱ्यांची कल्पना होती. मात्र, लातुरातील काम पाहून त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. जलयुक्त लातूरसाठी प्रत्येकजण आपला खारीचा वाटा उचलतो आहे. लातूर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत असणारे किशनराव साळुंके यांनी आपले वैयक्तिक ११ हजार १११ रुपये या कामासाठी देऊ केले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल लातुरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लातूरच्या ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र व नरहरे क्लासेसच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश जलयुक्त लातूरसाठी सुपूर्द करण्यात आला. सतीश नरहरे यांनी जलपुनर्भरण व वृक्षारोपण जागृतीसाठी घडीपत्रक व स्टीकरची छपाई केली असून त्याचे अनावरणही जलयुक्त कार्यालयात करण्यात आले.  मराठवाडा न्यू ऑईलमिल असोसिएशनचे सचिव भगीरथ कलंत्री, श्यामसुंदर बियाणी, श्यामसुंदर बांगड यांनी १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश जलयुक्त लातूरकडे सुपूर्द केला आहे. लातूर जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाने १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या हस्ते जलयुक्तच्या कामासाठी देऊ केला. यात कमलेश ठक्कर यांनी ५१ हजार व अरुण कामदार यांनी २१ हजार रुपयांचा वैयक्तिक निधीही देऊ केला आहे. जलयुक्त कार्यालयात या प्रसंगी नीलेश ठक्कर, त्र्यंबकदास झंवर, मकरंद जाधव आदींची उपस्थिती होती.