रस्त्यात वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटात झालेल्या वादाला धार्मिकतेचा रंग देताना जबरदस्तीने दुसऱ्या गटातील तरुणाला ‘जय श्रीराम’ म्हणायला लावल्याची घटना आझाद चौकात रविवारी मध्यरात्री घडल्याची नोंद सिडको पोलीस ठाण्यात झाली आहे. या वादानंतर एमआयएमच्या एका नगरसेवकाने जमावाला भडकावणारी विधाने केली असून त्यासंदर्भातील एक चित्रफीतही पोलिसांच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे संबंधित नगरसेवक पोलिसांसमोरच या वादाला धार्मिकतेचा रंग देताना दिसतो आहे. मात्र त्या नगरसेवकावर कारवाई करणार का, याबाबत पोलीस मात्र भूमिका स्पष्ट करीत नाहीत.

‘‘आम्ही काय हातावर हात धरून बसण्यासाठी खासदाराला निवडून दिले आहे का, आठ-दहा जण गेले तर गेले कारागृहात, पण प्रतिकार करायचे सोडणार नाही, चला रे त्यांच्याकडे’’ अशा प्रकारे जमावाला भडकाविणारे विधान करणारा एमआयएमचा नगरसेवक चित्रफितीत दिसतो आहे. तरुणांचा वाद झाल्यानंतर त्याला धार्मिकतेचा रंग दिला जात असल्याचे पाहून घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला होता. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकासमोरच त्या नगरसेवकाने भडकाऊ विधान केल्याचे दिसते आहे. ही चित्रफीत पोलिसांच्या हाती असून त्यावर काय भूमिका घ्यायची, यावर विचारमंथन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे गुरुवारी रात्री हडको कॉर्नर परिसरातही इम्रान पटेल यालाही जय श्रीराम म्हणायला भाग पाडले असल्याची तक्रार नोंदवायला लावण्यामागे एमआयएमच्या त्या नगरसेवकाचाच हात असल्याचा संशय आता पोलिसांना येत आहे. इम्रान पटेल आणि सिडकोतील आझाद चौकातील वादात अडकलेला शेख अमेर शेख अकबर याच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराला धार्मिक रंग देण्यामागे एमआयएमच्या त्या नगरसेवकाचा किती सहभाग आहे, याचा पोलीस आता तपास करत आहेत.

तक्रारदाराच्या भूमिकेविषयी संभ्रम
फिर्यादी शेख अमेर याने मला चौघांनी जय श्रीराम म्हणायला लावल्याची तक्रार सोमवारी सिडको ठाण्यात दिली. यानंतर त्याचा पुन्हा पुरवणी जबाब नोंदवण्यात आला असून त्यात शेख अमेरने श्रीराम म्हणायला लावण्यासारखे काही घडलेच नाही, असे म्हटल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पोलिसांच्या वेगवेगळ्या आणि सावध प्रतिक्रिया येत आहेत. सिडकोचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर प्रत्यक्ष फिर्यादी शेख अमेर याच्याशी संपर्क केला असता मूळ तक्रार कायम असल्याचे त्याच्या भावाने सांगितले.
या प्रकरणावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद व अन्य पोलीस अधिकारी स्पष्ट प्रतिक्रिया देत नसून सखोल तपासानंतरच आम्ही एका निष्कर्षांवर येऊ, असे ते सांगत आहेत. मंगळवारी आयोजित पत्रकार बठकीतही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जय श्रीराम म्हणण्याची घटना घडली नसून तो एक रस्त्यातील वाद असल्याच्या प्रतिक्रियेचा पुनरुच्चार केला. सोमवारीही प्रसाद यांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती.

बदनामीचा डाव; नार्को चाचणी करावी
हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी ‘जय श्रीराम’ म्हणण्याची सक्ती केल्याचा कांगावा आणि त्याआधारे राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काही जण ही भ्याड कारस्थाने करत आहेत. मात्र समाजाने विचलित न होता शांतता राखावी, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे व प्रचार प्रसिद्धिप्रमुख राजीव जहागीरदार यांनी केले आहे. दरम्यान ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडले, अशी फिर्याद देणाऱ्या तक्रारदाराचीच नार्को चाचणी करावी व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ (आठवले) इंडियाचे मराठवाडा युवा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी केली आहे.