सात कोटींचे नुकसान केल्याचा पोलिसांचा दावा

औरंगाबाद : एमआयएमचा दंगेखोर विरोधी पक्षनेता फेरोज मोईनोद्दीन खान मंगळवारी सायंकाळी पोलिसांना शरण आले. खान यांना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी गेले होते.

मात्र खान सापडले नाहीत. अखेर आमदार इम्तियाज जलील व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सिटी चौक पोलिसांसमोर हजर केले. या वेळी एमआयएम कार्यकर्त्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिटी चौकात जमला होता. रात्री साडेसातच्या सुमारास फेरोज खानला प्रथम वर्गन्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गारखेडा परिसरातील दीपक मन्नालाल जैस्वाल (६८) यांचा शहागंज भागात चंदन बियरबार व जुने घर आहे. ११ मे रोजी मध्यरात्री राजाबाजार, जुना नवाबपुरा, शहागंज आणि गांधी पुतळा भागात दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान दंगलीत झाले होते. या वेळी चारशे ते पाचशे दंगेखोरांसह विरोधी पक्षनेता फेरोज खान यांनी त्यांच्या बियरबारच्या गोदामामधील विदेशी मद्याचा साठा पेटवून दिला. यात बियरबारसह त्यांचे घरही जळून भस्मसात झाले. घरातील फर्निचर व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याचे जैस्वाल यांना सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी चारशे ते पाचशे दंगेखोरांनी ७५ लाखांचे नुकसान केल्याची तक्रार सिटी चौक पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून मंगळवारी सकाळपासून विशेष तपास पथकाचे पोलीस फेरोज खानचा शोध घेत होते. आज सकाळी पोलिसांनी त्याच्या घराला वेढा घालत तपासणी केली होती. मात्र, तो या वेळी पसार झाला होता. सायंकाळी एमआयएम आमदार जलील हे काही कार्यकर्त्यांसह फेरोज खानला सोबत घेत पोलिस ठाण्यात आले. तेथे त्यांनी फेरोज खानला पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, फेरोज खान यांना मंगळवारी सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीसाठी सहायक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड आणि एसआयटीचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या वेळी युक्तिवाद केला. तेव्हा त्यांनी फेरोज खानने जाळपोळ व तोडफोड करून नागरिकांच्या सात कोटी मालमत्तेचे नुकसान केले आहे. आणखी तक्रारी पोलिसांना प्राप्त होत आहेत. फेरोज खानने दोन समाजात तेढ निर्माण केला. त्याने पेट्रोल, डिझेल व रॉकेल कोठून आणले होते. दगडफेकीत दोन सहायक पोलीस आयुक्त, दोन निरीक्षक व एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यापैकी सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, कट कुठे रचला गेला, कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले. तसेच अर्धागवायूचा झटका आलेल्या वृद्ध जगनलाल बन्सिले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. त्या अनुषंगाने प्रकरणाचा तपास करायचा असल्याचे नवले यांनी न्यायालयासमोर सांगितले.

मृत बन्सिलेप्रकरणी खुनाचा गुन्हा

औरंगाबादेत उसळलेल्या हिंसाचारादरम्यान दंगेखोरांनी फेकलेल्या आगीच्या टेंभ्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन जगनलाल बन्सिले यांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी मृत जगनलाल बन्सिले यांच्या मुलाच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात अनोळखी जमावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर या तपास करीत आहेत.