औरंगाबाद महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कार्यपद्धतीच्या विरोधात एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारी आंदोलन केले. अधिकारी वॉर्डातील विकास कामसाठी सहकार्य करत नाहीत. तसेच समस्या निवारणासाठी केलेला साधा फोनही उचलण्याचे कष्ट घेत नाहीत, असा आरोप करत एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दाखवून दिला. यावेळी अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभाराकडे लक्षवेधण्यासाठी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी मार्गाने निषेध व्यक्त केला.

शहर अभियंता सय्यद सिकंदर अली आणि सिद्दीकी यांच्या दालनाला आणि खुर्चीला हार घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ‘अधिकारी हरवले आहेत. शोधून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल.’ अशा स्वरूपाचे पोस्टरही कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांना चिटकवण्यात आले. अधिकारी वर्गाच्या दिरंगाईमुळे शहर विकासाची काम होत नसल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी  केला. नगरसेवकांच्या आंदोलनानंतर पालिका आयुक्त संबंधिताच्या कामासंदर्भात अहवाल मागवून योग्य ती कारवाई करणार का? हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल.