22 November 2019

News Flash

औरंगाबादेत एमआयएम आक्रमक; महापौर ‘लक्ष्य’

एमआयएम नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

(संग्रहित छायाचित्र)

चहा व जेवणासाठी ८ लाख ८८ हजारांवर खर्च केल्याचा आरोप

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले आणि एमआयएम नगरसेवकांमधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव धुडकावून लावणे महापौरांच्या अंगलट येत असून घोडेले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केवळ चहा व जेवणावर तब्बल ८ लाख ८८ हजार रुपयांचा खर्च केल्याचा आरोप करीत एमआयएम नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान, एमआयएमच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी महापौरांनी मनपा प्रशासन कामाला लावले असून एमआयएमचे माजी विरोधी पक्षनेत्याने मुशायऱ्याच्या माध्यमातून १० लाखांचा अपहार केल्याच्या मुद्दय़ाची ढाल पुढे केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेच्या सर्वसर्वसाधारण सभेत व महापौरांच्या दालनातील चहा, जेवणावर अनुक्रमे ४ लाख १९ हजार ५९४ व ४ लाख ६८ हजार ४४५, असा एकूण ८ लाख ८८ हजार रुपयांचा खर्च केला आहे. याशिवाय महापौरांनी छायाचित्रे व छायाचित्रण यांच्यावर २० लाख रुपये खर्च दाखवल्याचा आरोप एमआयएम नगरसेवकांनी केला. महापालिका जनतेच्या पैशांची उधळपट्टी करीत असल्याचे दर्शवत एमआयएमच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, प्रतिकात्मक महापौर हातात पैसे घेऊन उभे असल्याचे दर्शवण्यात आले होते. महापौरांच्या प्रतिमेला काळेही फासण्यात आले होते. महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

औरंगाबादची ओळख कचरा व खड्डय़ांचे शहर म्हणून करण्यातही महापौरांचाच हात अधिक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शहराच्या दुर्दशेला महापौर घोडेले व त्यांचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे टक्केवारीचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी केला.

एमआयएमच्या सदस्या तथा महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सरिता अरुण बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये एमआयएमचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद लोकसभेवर निवडून गेल्याबद्दल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन करण्याचा ठराव घेण्याची मागणी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी केली होती. मात्र भाजप सदस्यांकडून आलेल्या ठरावानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्यातच सर्वाचे अभिनंदन आले आहे, असे म्हणत महापौर नंदकुमार घोडेले यांनी खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी धुडकावली. शिवाय आक्रमक झालेल्या २० एमआयएमच्या सदस्यांना एक दिवसासाठी निलंबित करून पोलीस बळाचा वापर करीत सभागृहाबाहेरही काढले होते. २० सदस्यांच्या कायमस्वरुपी निलंबनासाठी शासनाकडे शिफारस करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती महापौरांनी माध्यमांना दिली होती. त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी महापौरांनाच लक्ष्य केले आहे. जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव एमआयएमकडून मांडण्यात येणार, हे अपेक्षित धरून भाजप सदस्यांनी शहरातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून भाजप सदस्यांनीही राजदंड पळवला होता. त्यादिवसापासून शिवसेना-भाजप युती व एमआयएम, असे महापालिकेतील राजकारण आता चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

खर्चाबाबत प्रशासनाकडून खुलासा

महापौरांवरील आरोपांचे खंडन करण्यासाठी महापालिका प्रशासन पुढे सरसावले आहे. महापौरांच्या २९ ऑक्टोबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ या कार्यकाळातील छायाचित्रणाचे व फुल, पुष्पगुच्छांवरील खर्चाचे स्पष्टीकरण दिले आहे. विविध ठिकाणचे अतिक्रमण काढतानाच्या घटनांवरील छायाचित्रणासाठी ४ लाख ९५ हजार ३६०, ऐनवेळचे स्वागत समारंभ, पत्रकार बैठका, जयंती आदी कार्यक्रमांतील पुष्पगुच्छांवर ३ लाख ६८ हजार ३१२, घनकचरा विभागाच्या विशेष मोहिमेवर दहा लाख ८ हजार ५५० तर महापौरांच्या सूचनेनुसार प्रशासकीय कामासाठी वापरलेले छायाचित्रांच्या देयकासाठीचे १ लाख २१ हजार ७५, असा मिळून १९ लाख ९३ हजार २९७ रुपयांचा खर्च झाला असून महापौरांना १२ हजार रुपये प्रतिमहिना चहासाठी देण्यात येतो, असे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एमआयएमकडून करण्यात येत असलेले आरोप निराधार आहेत. ते प्रशासनाच्या पातळीवरील आहेत. प्रशासनच त्याबाबत खुलासा करेल. आपण शहराचा प्रथम नागरिक या नात्याने आणि महापौर पदाला शोभेल, यापद्धतीने भेटायला आलेल्या प्रत्येक नागरिकाचे आदरातिथ्य केलेले आहे.

– नंदकुमार घोडेले, महापौर.

First Published on June 18, 2019 12:30 am

Web Title: mim corporators oneday hunger strike in front of the aurangabad municipal corporation
Just Now!
X