मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं एकदिवसीय उपोषण सुरू आहे. या उपोषणासाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसून अपेक्षांचं उपोषण असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितल्या.

पंकजा मुंडे यांच्या एकदिवसीय उपोषणावर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. पंकजा मुंडे यांच्या उपोषणावर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जलील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, ‘पंकजा मुंडे यांचं उपोषण म्हणजे नौटंकी आहे. सरकार गेल्यामुळे त्यांची ही नौटंकी सुरू आहे. ज्यावेळी भाजपाचं राज्यात आणि केंद्रात सरकार होतं, त्यावेळी त्यांनी काय केलं. हे पुढारी नागरिकांना मूर्खात काढत आहेत.’

पुढे बोलताना जलील म्हणाले की, ‘पाच वर्ष तुमचीच सत्ता होती आणि तुम्ही मंत्री होता. त्यावेळी तुम्ही काय केलं. लोक तुमच्या नौटंकीला ओळखलील.’ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार देखील नाटक असल्याचा आरोप जलील यांनी केलाय.

मराठवाडय़ाचा प्रश्न

कृष्णा खोऱ्यात असलेल्या मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्य़ासाठी २३.६६ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध होते. त्यातील केवळ सात अब्ज घनफूट पाणी वापरास परवानगी मिळालेली आहे. उर्वरित पाणी मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारंवार म्हटले आहे. कारण पाणी उपलब्ध नसताना कागदोपत्री असल्याचे भासवून सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले, अशी माडणी भाजपमधून पूर्वी होत होती. आता पुन्हा याच प्रकल्पातून ४९ टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी केली जात आहे. सात टीएमसी पाणी मंजूर असताना त्या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात मिळणारा निधी एवढा कमी आहे की ते काम वर्षांनुवर्षे सुरू आहे. २००४ पासून ते २०२० पर्यंत म्हणजे १६ वर्षांपासून या तीन जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल, असे निवडणुकीपूर्वी सांगायचे आणि नंतर गरज असेल तेव्हा आंदोलनाचा विषय म्हणून ‘पाणी गुंता’ पुढे करायचे, असे धोरण दिसत असल्याची टीका होत आहे.