मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर फुले उधळून गांधीगिरी करण्याचा खासदार जलील यांचा इशारा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दररोज शुद्ध पाणी येते, रस्ते चकाचक झाले आहेत, बांधलेल्या उड्डाण पुलांमुळे वाहतुकीचे प्रश्न मिटले आहेत. शिवसेनेने दिलेल्या १४ महापौरांमुळे सारे घडत आले. तसेच सिंचनाच्या अनुशेषाचे प्रश्न मिटले आहेत. मराठवाडय़ातील शेतीचे प्रश्न मिटले आहेत. त्यामुळे मराठवाडा मुक्ती दिनाच्या ध्वजारोहरण सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर दतर्फा उतरतील. त्यांच्या गाडीवर फुले उधळतील अशी तिरकस भाषा वापरत एमआयएमने मराठवाडा मुक्ती दिनी गांधीगिरी करण्याचे ठरविले आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि खासदार म्हणून विजय मिळविल्यानंतरही मराठवाडा मुक्तीच्या कार्यक्रमास गैरहजर राहणारे खासदार इत्मियाज जलील यांनी या वेळी या कार्यक्रमास हजर राहण्याचे सोमवारी पत्रकार बैठकीत जाहीर केले. मुक्ती दिन साजरा करताना कोणतीही घोषणा न करता मुख्यमंत्र्याच्या स्वागताचे फलक घेऊन मराठवाडाप्रेमी कार्यकर्ते हजर राहतील, अशी तिरकस टिप्पणी करत खासदार जलील यांनी सेना नेत्यांची खिल्ली उडवली.

गेली काही वर्षे मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे हजर राहता आले नाही. पण याचा अर्थ काही जण वेगळा काढत होते. त्यावरून खूप टिकाटिप्पणी झाली. पण या वेळी या ध्वजारोहणास उपस्थित राहणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी जाहीर केले. ज्या शिवसेनेने औरंगाबाद शहरावर आणि मराठवाडय़ावर राज्य केले. त्या मराठवाडय़ाचा विकास आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यापासून पोलीसही रोखू शकणार नाहीत. आम्ही आंदोलन करत नाही तर स्वागत करत आहोत, असे सांगत त्यांनी तयार कलेले फलकही पत्रकार बैठकीत वाचून दाखविले. क्रीडा विद्यापीठासाठी २०१९ च्या अतिरिक्त मागण्यांमध्ये निधीची तरतूद झाली होती. तरीही हे विद्यापीठ पुणे येथे नेण्यात आले. पूर्वीही मंजूर झालेल्या दर्जेदार संस्था पळविण्यात आल्या. त्याविरोधात आवाज उठविला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याविरोधात आंदोलनही केले पण क्रीडा विद्यापीठाऐवजी संतपीठातून संत घडविण्यावर शासनाचा भर आहे. नव्याने सरकारने विकासकामांची पुस्तिका तयार केली आहे. त्यात अनेक प्रश्न सोडविल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी प्रश्न सोडविले म्हणून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करत आहोत असे जलील तिरकसपणे म्हणाले. मराठवाडा मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी देता येणार नसल्याचे एका नोटिसीव्दारे कळविल्यानंतर खासदार जलील यांनी अशी गांधीगिरी करण्याचे ठरविले आहे.

आम्ही मराठवाडय़ाचे मावळे

कोण रझाकार आम्हाला माहीत नाही. आम्ही मराठवाडय़ाचे मावळे आहोत. मराठवाडाप्रेमी आहोत. ज्यांनी कधी काही मराठवाडय़ासाठी केले नाही असे लोक मराठवाडा मुक्ती दिनी ध्वजारोहरणास उपस्थित राहत नाही म्हणून टीका करत होते. पण या वर्षी या कार्यक्रमास हजर राहरणार आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्नही विचारायचे आहेत. पण सरकारने केलेले विकासाचे दावे पाहता त्यांचे जिल्ह्य़ाचा लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करणे अपरिहार्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर फुले उधळण्याचे आणि त्यांचे स्वागत आणि धन्यवाद मानण्यासाठी कार्यकर्ते उभे राहतील असे तिरकसपणे म्हणत खासदार जलील यांनी पहिल्यांदाच रझाकाराशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या उपक्रमात किती कार्यकर्ते सहभागी होणार हे मात्र स्पष्टपणे सांगितले नाही. मराठवाडाप्रेमी कार्यकर्ते सहभागी होतील असे ते म्हणाले. हा कार्यक्रम म्हणजे आंदोलन नव्हे. त्यात कोणतीही घोषणाबाजी होणार नाही. त्यामुळे यासाठी पोलिसांची परवानगी घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.