औरंगाबाद महापालिका निवडणुकीमध्ये आजमावून पाहिलेला दलित-मुस्लीम ऐक्याचा नारा देत मराठवाडय़ातील नगरपालिकांमध्ये मजलिस-ए-इत्तिहादुल मुसलमीन (एमआयएम) पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. औरंगाबाद जिल्हय़ातील सर्व पाच नगरपालिका क्षेत्रात नगराध्यक्षपदासह सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले जाणार आहेत. तसेच जालना, परभणी, बीड व उस्मानाबादमध्येही एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उभे केले जाणार असून प्रत्येक ठिकाणी असदोद्दीन ओवेसी प्रचारासाठी येणार असल्याची माहिती कोअर कमेटीचे सदस्य गफार कादरी यांनी दिली. औरंगाबाद महापालिकेत मिळालेल्या यशानंतर दलित- मुस्लीम ऐक्याचा प्रयोग सर्व ठिकाणी केला जाणार आहे.

मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर दलित समाजात अस्वथता आहे. मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न मराठा मोर्चाच्या निमित्ताने ऐरणीवर येऊ शकतो. त्यामुळे त्या मागणीला मुस्लीम समाजातून चांगला पाठिंबाही मिळत आहे. या पाश्र्वभूमीवर शहरी भागातील दलित वस्त्यांमध्ये एमआयएमने उमेदवार देण्याचे ठरविले आहे. केवळ मुस्लीमच नाही तर अन्य समाजातील व्यक्तींनाही उमेदवारी दिली जाणार आहे. या निवडणुकीत ओवेसी प्रचार करणार असल्याने मतांचे ध्रुवीकरण पुन्हा धार्मिक आधारावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्वत: ओवेसीही प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात दोन दिवस देणार आहेत. खुलताबाद, कन्नड, गंगापूर, पैठण यासह मराठवाडय़ात ज्या शहरात मुस्लीमबहुल भागात ताकदीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल, असे गफार कादरी यांनी सांगितले. औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील पाच जण दलित असल्याने मराठवाडय़ात हे सूत्र यशस्वी होऊ शकते, असा दावा केला जात आहे. उमेदवारी मागण्यासाठी दलित समाजातील तरुणांचा ओढा असल्याचा दावा जालना आणि औरंगाबादचे प्रभारी गफार कादरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.