19 February 2020

News Flash

वंचित आघाडी-एमआयएमचे बिनसले

एमआयएमकडून ७४ जागांची मागणी; वाटपाचा तिढा कायम

एमआयएमकडून ७४ जागांची मागणी; वाटपाचा तिढा कायम

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नाहीत, हे निकालानंतर आलेल्या आकडेवारीमुळे स्पष्ट झाले. परिणामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता आहे.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकलेला नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदोद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दलित-मुस्लीम ऐक्य घडल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात असे सांगत लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदोद्दीन ओवेसी यांनी विशेष सभा घेतली होती. या सभेनंतर एमआयएने कधीही आक्रमक भूमिका घेतली नाही. उलट प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहेत, ते जे सांगतील तसेच होईल, असे एमआयएमचे नेते सांगत.

खासदार म्हणून निवडून आलेल्या जलील यांनीदेखील आम्ही दिलेली जागांची यादी अंतिम नाही. आम्ही याबाबत लवचिक भूमिका घेत आहोत, असे वारंवार स्पष्ट केले होते. मात्र, दिल्या जाणाऱ्या जागा आणि दोन वेळा बैठका होऊनही ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील चर्चेचा भाग अजून स्पष्ट झालेला नाही. ५ सप्टेंबपर्यंत वाट पाहा, असे ओवेसी यांनी कळविले होते, एवढेच खासदार जलील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २४ जागा लढविल्या होत्या. त्यापेक्षा अधिक जागा मिळाव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या बोलणीला फारसे यश येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडेच प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मुस्लीम तरुणांची स्वतंत्र बैठक घेतली होती. तत्पूर्वी एमआयएमने मागितलेल्या जागांबाबत आपण खूश नाही, असा संदेश देणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतून एमआयएमला बाजूला सारले जाण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

First Published on September 5, 2019 1:20 am

Web Title: mim vanchit bahujan aghadi alliance likely to break over seat sharing zws 70
Next Stories
1 चला, आईसोबत भांडी घासू या!
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी औरंगाबादेत
3 आरोपींना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Just Now!
X