औरंगाबाद : वक्फ बोर्डचे कामकाज समाधानकारक नाही. त्यात सुसूत्रता आणण्यासाठी मुख्य कार्यालय मुंबई येथे स्थापन करण्यात येईल आणि प्रत्येक विभागात क्षेत्रीय कार्यालये सुरू केली जातील, असे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले. राज्यातील दोन खासदारांचा या बोर्डवर नियुक्ती व्हावी म्हणून कायदेशीर सल्ला मागण्यात आला असून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे नियुक्ती केल्या जातील. कामकाज अधिक पारदर्शी व्हावी म्हणून सारा कारभार ‘ऑनलाइन’ केला जाईल, असेही ते म्हणाले.

वक्फच्या सर्वाधिक जमिनी मराठवाडय़ात असल्याने असे कार्यालय मुंबई येथे नेणे किती योग्य असा प्रश्न केला असता मराठवाडय़ापासून दूर असणाऱ्या व्यक्तींना औरंगाबादला येण्यापेक्षा मुंबईपर्यंत पोहचणे अधिक सोपे असल्याचे नबाव मलिक म्हणाले. केंद्राने वक्फ बोर्डाचे कामकाज कसे असावे याचा कायदा अंमलबजावणीत आणल्यानंतर सार्वजनिक संस्थांच्या नोंदणीची प्रकरणे वक्फ बोर्डाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ८० हजारांहून अधिक प्रकरणे वर्ग करण्यात आली असून काही प्रकरणांबाबत चर्चा सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. भाजपच्या काळात या बोर्डचे काम नीटपणे होत नव्हते. आता पुन्हा एकदा दुरुस्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली असल्याचा दावा मंत्री मलिक यांनी केला. करोनामुळे गेल्या काही दिवसांत सुरू करण्यात आलेली बदल प्रक्रिया मंदावली होती. मात्र, या पुढे हा वेग अधिक वाढविला जाईल, असेही ते म्हणाले. गेली अनेक वष्रे काही जमीन प्रकरणांमध्ये तक्रार करूनही काही उपयोग होत नाही, असे नवाब मलिक यांना सांगण्यात आला. मात्र, योग्य ती कारवाई होईल तसेच या पुढे वक्फ बोर्डच्या वादाची माहितीही पोर्टलवर देण्यात येणार आहे. बोर्डच्या कारभारात बदल केले जाणार असल्याचा दावा मंत्री मलिक यांनी केला.