उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती

औरंगाबाद : लघु व मध्यम उद्योगाची प्रगती ही राज्याच्या सर्वागीण विकासात रोजगाराच्या मोठय़ा संधी उपलब्ध करून देते. औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या औरंगाबादच्या उद्योजकतेला अधिक संधी मिळावी, यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ९ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता चिकलठाणा येथील कलाग्राम परिसरात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

एनकेजीएसबी को-ऑप. बँक प्रस्तुत व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने लघु व मध्यम उद्योजकांसाठी आयोजित या उपक्रमास मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड असोसिएशन (मसिआ) या औद्योगिक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन हे या सत्रात विशेष मार्गदर्शन करतील.

महाराष्ट्राची औद्योगिकता वाढती राहावी. त्यात लघु आणि मध्यम उद्योजकांना अधिक स्थान असावे, या हेतूने राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘लोकसत्ता’च्या वतीने असे चर्चासत्र आयोजित केले जाते. उद्योग मंत्रालय आणि उद्योजक यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व्यासपीठ म्हणून अशा चर्चासत्रांचा उपयोग होत असल्याचा अनुभव औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांना येत आहे. औरंगाबाद येथे होणाऱ्या या परिषदेस मुंबई शेअर बाजारचे मुख्य नियामक अधिकारी नीरज कुलश्रेष्ठ मार्गदर्शन करणार आहेत. मसिआ संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे हे औरंगाबादसह मराठवाडय़ातील लघु व मध्यम उद्योगांची शक्तिस्थळे आणि समस्यांबाबतचा ऊहापोह या चर्चासत्रात करतील. यानंतर विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्योगमंत्री यांच्यात चर्चाही होणार आहे. मराठवाडय़ातील उद्योजकतेबाबतच्या समस्या आणि त्यावर करायच्या उपाययोजना याबाबत या वेळी चर्चा होणार आहे. शहरातील बहुसंख्य उद्योजक या चर्चासत्रात उपस्थित राहणार आहेत.