बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी कळमनुरीतील आ. संतोष टारफे यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न केला. नाईकनगर भागात ही घटना घडली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र यात कारचे नुकसान झाले आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आ. संतोष टारफे यांचे शहरातील नाईकनगर येथे निवासस्थान आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरासमोरील कार पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही बाब शेजार्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती आमदार टारफे यांना दिली. यानंतर आग विझविण्यात आली. आगीमुळे कारमधील सीट व वातानुकूलित यंत्रणा जळाली आहे. कृत्य कोणी व का केले या बाबत अद्याप उलगडा झाला नाही. आमदारांच्या घरासह परिसरातील अन्य घरांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या प्रकरणी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 2:53 pm