मकरंद अनासपुरे यांच्या मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा विनोदी किस्सा प्रेक्षकांनी अनुभवला आहे. असाच फिल्मी किस्सा औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. या मराठी चित्रपटाप्रमाणे कन्नड तालुक्यात गावं हरवली असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली असून ती शोधून देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीमधून खापेश्वर, झाडेगावतांडा, सावरखेडा, मांडवा, शिंदेवाडी आणि घोडेगाव या गावात काम करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात अशा नावाची गाव जिल्ह्यात नाहीत. मग निधी कोणत्या गावासाठी मंजूर करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला होता. खासदारांनी मात्र निधी मंजूर करुन तो खर्च देखील केला आहे. याप्रकरणानंतर कन्नड तालुक्याती ही गावं हरवली आहेत, असे सांगत रवींद्र एकनाथ मोतींगे यांनी त्याबाबत तक्रार दाखल केली आहे. हरवलेली गावं शोधून द्यावी,  यासाठी कन्नड पोलिसात अर्ज करण्यात आला आहे.