News Flash

‘लातूर महाराष्ट्रात असल्याचा सरकारला विसर पडला काय?’

लातूर महाराष्ट्रात असल्याचा सरकारला विसर पडला काय, असा सवाल लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार बैठकीत केला.

लातूरच्या पाणी प्रश्नासंबंधी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. लातूर महाराष्ट्रात असल्याचा सरकारला विसर पडला काय, असा सवाल लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार बैठकीत केला.
आमदार त्र्यंबक भिसे, महापौर अख्तर शेख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे या वेळी उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले, की लातूरच्या प्रश्नाबद्दल लक्ष वेधण्यासाठी सहा महिन्यांपासून सरकारकडे वारंवार निवेदने दिली, धरणे आंदोलने केली. लातूरचा पाणीप्रश्न थेट राष्ट्रपतींपर्यंत पोहोचला, तरी राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नाही. लातूर शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठा व्हावा या हेतूने उजनीहून लातूरला पाणी द्यावे, अशी आमची मागणी आहे. गेल्या महिनाभरापासून लातूर शहराचा पाणीपुरवठा टँकरवर चालू आहे. भंडारवाडी व डोंगरगाव येथील नागरिकांकडून पाणी देण्यास विरोध होत आहे. तेथील नागरिकांना समजावून सांगण्याची भूमिका सरकारची आहे. सरकारने लातूरला पाणी कुठून द्यायचे ते ठरवावे. यासंबंधी कोणताही निर्णय होत नाही. उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारवर दुष्काळाबाबत काय उपाययोजना केल्या? असे ताशेरे ओढल्यानंतर राज्याचे मंत्रिमंडळ लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हय़ांच्या दौऱ्यावर येत आहे यावरूनच सरकार किती गंभीर आहे हे लक्षात येते, अशी टीका देशमुख यांनी केली.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे दुष्काळग्रस्त भागात दौरे झाले. मात्र, त्याचे फलित काय? लातूरची जनता धीर धरणारी आहे. त्यामुळे उद्याच्या दौऱ्यातून काही मिळेल, अशी आशा अजूनही लातूरकर बाळगून आहेत. आजपर्यंत पोकळ आश्वासने दिली गेली. आता तरी सरकारने ठोस निर्णय घ्यावा. अधिग्रहण केलेल्या विहिरींचे ६ महिन्यांपासूनचे पसे प्रलंबित आहेत, ते आठ दिवसांत द्यावेत. जलजागृती करण्यासाठी कोटय़वधी खर्च होत आहेत. हे खर्च होणारे पसे थांबवून दुष्काळग्रस्त भागाच्या जनतेचे प्रश्न काय आहेत हे शोधण्यासाठी ते खर्च करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
काँग्रेसची मूक निदर्शने
लातूर शहरात पाण्यासाठी रोज भांडणे होत आहेत. या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे प्रश्न वेधण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे प्रमुख चौकात शांततेने ‘पाणी द्या’ या आशयाचे फलक घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे. निदर्शनात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 1:25 am

Web Title: mla amit deshmukh water problem
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा तीन जिल्ह्य़ांत पाहणी दौरा
2 विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागास फेरो इलेक्ट्रिक संयुगाचे पेटंट
3 वयोवृद्धांसाठी युरोपॅन्ट
Just Now!
X