मनसेकडील ढोल-ताशांच्या दणदणाटापुढे शिवसेनेचा ‘आवाज’ क्षीण

औरंगाबाद : तिथीनुसारची शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने क्रांती चौकात समोरासमोरच कार्यक्रम घेतले. त्यात मनसेच्या कार्यक्रमांना प्रत्यक्ष पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरेच उपस्थित राहिल्याने तरुणांची  गर्दी होती. तर शिवसेनेच्या कार्यक्रमात माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ व इतर काही नगरसेवक काहीवेळापुरते आले आणि हजेरी लावून गेले. मनसेने ढोल-ताशांसह लेझीम पथक, किल्ल्यांचे बुरुज-दरवाजांच्या नेपथ्यरचनेने सजवलेले व्यासपीठ तयार करून उत्सवी वातावरण निर्माण केले होते. त्या तुलनेने सकाळच्या वेळेतील शिवसेनेच्या कार्यक्रमातील पोवाडय़ाचा आवाज मनसेच्या ढोल-ताशांच्या दणदणाटात काहीसा क्षीण वाटून गेला, तर सायंकाळी शिवसेनेकडूनही जोरदार कार्यक्रम घेण्यात आला.

क्रांती चौकात बुधवारपासूनच मनसेकडून कार्यक्रमाच्या व्यासपीठाची बांधणी करण्यात येत होती. प्रत्यक्ष पक्षप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे, अभिजित पानसे अशी नेतेमंडळी येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठीचे फलक शहरभर लावण्यात आलेले होते. बुधवारी सायंकाळीच राज ठाकरे यांचे शहरात आगमन झाले. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ठाकरे पिता-पुत्रांचे क्रांती चौकात शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी शंभूनाद वाद्य पथक, ओम मृत्युंजय क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, मल्लखांबाचे खेळाडू, हिंद प्रतिष्ठानच्या खेळाडूंचे तलवारीने मानेवरील केळे कापण्याच्या चित्तथरारक कवायती, शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तयार होते. तर शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी किल्ल्याच्या नेपथ्यरचनेचे व्यासपीठ करून त्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभा केलेला होता. सोबतीला पोवाडय़ाचे स्वर ऐकवण्यात येत होते. दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमांतील ढोल-ताशांसह शिवजयंती साजरी केली. या वेळी अभिजित पानसे, प्रकाश महाजन, सुहास दाशरथे, सुमित खांबेकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवजयंती सणच; म्हणून तिथीनुसार साजरी

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवरायांना अभिवादन केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपल्याकडे दिवाळी, गणपती, दसरा हे सर्व सण तारखेनुसार नाही, तर तिथीनुसारच साजरे केले जातात. महाराजांची जयंती हा आपल्यासाठीही एक सणच आहे. त्यामुळे शिवजयंती ही तिथीनुसार साजरी केली पाहिजे. खरेतर त्यांची जयंती वर्षभर साजरी व्हायला हवी, असे सांगताना, करोनाच्या भीतीपोटी गर्दी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना रोखले जाण्याच्या निर्णयाची  त्यांनी खिल्ली उडवली.