|| सुहास सरदेशमुख

एक पाऊस दाटलेला आभाळात. एक हवामान खात्याच्या रुक्ष संदेशात अडकलेला. कुठे धो-धो बरसणारा तर  त्याची कुठे हुलकावणी पाचवीला पुजलेली. पण एक पाऊस दाटलेला डोळय़ात. ‘पाऊस नाही आला तर पीक येत नाही. पीक आलं नाही तर पैसे येत नाहीत. तसं झालं की मम्मी आम्हाला भेटायला येत नाही.’ सहावीतील सुदर्शनच्या डोळय़ात आता पाऊस दाटला होता. त्याच्या वडिलांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. जालना जिल्हय़ातील परतूर तालुक्यातील संकणपूरचा तो राहणारा. घरात तीन एकर शेती. वडील गेले आणि आजी-आजोबांनी आईच्या नावावर एक एकर शेती केली. एकरभर रानात पिकणार तरी काय म्हणून आई मजुरीला जाते. सुदर्शन आणि त्याची बहीण तृप्ती औरंगाबाद शहरातील हेडगेवार पब्लिक स्कूलमध्ये दाखल झाली. श्यामसुंदर कनके यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी ही शाळा सुरू केली. चार वर्षांपूर्वी दाखल झालेले हे बहीण-भाऊ पावसाकडे असे बघतात. पाऊस आला, तेव्हा भिजून घेतलं दोघांनी. पण त्यांच्या आयुष्यात पाऊस येणं म्हणजे आईला भेटणं!

शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर सिद्धीच्या डोळय़ातील पाणी काही हटायला तयार नव्हते. बाहेर आभाळ भरून आले होते. पाच वर्षांच्या त्या लेकराचेही डोळे भरून आलेले. तिची आई सुनीता तिला शाळेत सोडून गेली. कर्जबाजारीपणामुळे सिद्धीच्या वडिलांनी आत्महत्या केलेली. तिला या संकटाची तशी जाणीव नाही. एक चॉकलेट बाईंनी दिले आणि सिद्धी रडायची थांबली.  सिद्धीची आई नांदेड जिल्हय़ातील भोसी गावातून मुलीला शाळेत सोडण्यासाठी आलेली.

मोठय़ा कष्टाने त्यांनी लेकराचा हात सोडवून घेतला. त्या निघून गेल्या आणि सिद्धीचे डोळे भरून आले. पाच वषार्ंचे ते लेकरू दिवसभर आईची आठवण करून रडत होते. आईला समजले होते, रात्री पाऊस पडला. त्यांना पुन्हा दोन एकरात पेरायचे होते सोयाबीन आणि कापूस. पण दरवर्षी पाऊस येतो आणि मग हुलकावणी देऊन निघून जातो. दुष्काळ मागे ठेवतो. मग पुन्हा डोळे आस लावून बसतात पावसाची वाट बघत! असे डबडबणारे अनेक डोळे आभाळाकडे नजर लावून बघतात.

मराठवाडय़ात आता पाऊस दाखल झाला आहे. शहरातही आज थेंब पडत होते. पण या सगळय़ा मुलांच्या लेखी पाऊस म्हणजे आईची भेट. पद्मावती ज्ञानेश्वर सूर्यवंशी अंबाजोगाईच्या बरदापूरची राहणारी. मोठय़ा बहिणीबरोबर या शाळेत आलेली. ती शिकली ११ वी पर्यंत. पुढच्या वर्गात तिचा एक विषय गेला. तिने आता गावी पार्लर टाकले आहे. पण तिच्या घरात आता पुरुष कोणीच नाही.

वडील नऊ एकर शेतीचे मालक, पण त्यांनी जीवन संपवलं. चुलते वारले, आजोबाही देवाघरी गेले. तेव्हापासून आईने कंबर कसली. पाच बहिणी आणि त्यांचा लहान भाऊ मिनीष कनकेसरांच्या शाळेत शिकतो. या मुलांना पाऊस अधिक प्रिय आहे. कधी पावसात भिजताना गावी तो बरसावा एवढीच त्यांची इच्छा असते. या शाळेतील मुलांचे स्वभाव तीव्र स्वरूपात व्यक्त होणारा बनतो. ही मुले व्यक्त होतात, ती रागातून. त्यांच्याकडे सतत लक्ष असावे असे त्यांना वाटत असते.

वडील गेल्याने काही दिवस सारेजण त्यांची काळजी घेतात. नंतर दुर्लक्ष होत जाते. मग मुले चिडचिडी होतात. त्यांना आई पाहावीशी वाटत असते. पण अनेक मुलांच्या घराची स्थिती अशी असते की त्यांच्या आईला वारंवार शाळेपर्यंत पोहचणे अवघड होते, असे शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा ढोणे सांगत होत्या. केवळ पैसा नाही म्हणून बसचा प्रवास टाळणाऱ्या अनेकजणी आहेत.

पाऊस सुरू झाला आणि शाळा सुरू झाली की लोखंडी ट्रंकमध्ये कपडे, वहय़ा, पुस्तके घेऊन मुले येतात तेव्हा पोटात कालवाकालव होते. या सर्वांना मोठा आंनद असतो जेव्हा त्यांची आई त्यांना भेटते. या मुलांना पाऊस येणे म्हणजे आई भेटीचा मार्ग सोयीचा झाल्याची भावना असते.