उत्पादन वाढताच भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल

उत्पादन जास्त आणि बाजारात भाव घसरलेले, या कापूस आणि कांदा उत्पादकांच्या नशिबी आलेल्या अनुभवाने आता मूग उत्पादकांनाही ग्रासले आहे. त्यामुळे त्यांच्या नशिबीही ‘कापूसकांद्या’चीच गोष्ट आली आहे!

गेल्या तीन वर्षांत उडीद, मुगाचा पेरा या वर्षी मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. चार ते पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मुगाच्या काढणीला वेग आला असून बाजारपेठेत मात्र आवक वाढताच भाव घसरले आहेत. नाफेडकडून मूग खरेदीचा शुभारंभ झाला असला तरी भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी मूग अद्यापही विक्रीसाठी बाहेर आणलेला नाही. उत्पादन वाढताच भाव घसरल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

बीड जिल्ह्यत या वर्षी उडीद आणि मुगाचा पेरा वाढला आहे. गेल्या तीन वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना ही पिके घेतांना अनेक अडचणी आल्या. उत्पादन नसल्याने उडदासह मुगालाही चांगला भाव होता. यंदा पाऊस चांगला झाल्याने खरिपातील पिके शेतकऱ्यांनी मोठय़ा अपेक्षेने घेतली आहेत. मुगाची २४ हजार १९८ हेक्टरवर लागवड झाली होती. जून व जुलमध्ये झालेल्या पावसामुळे मुगाचे पीकही जोमात आले. चार ते पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी मुगाची काढणी केली आहे.

 पीक नसतानाही भाव होता..

बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या हमी दराने मूग खरेदीचा शुभारंभ झाला. नाफेडच्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या मुगाला सरकारने ४ हजार ८०० रुपये व बोनस म्हणून ४२५ असा एकूण ५ हजार २२५ रुपयांचा भाव निश्चित केला आहे. गतवर्षी हाच भाव आठ हजार रुपयांपर्यंत होता. तेव्हा शेतकऱ्यांकडे मुगाचे पीक नसताना त्याला तब्बल आठ हजार रुपयांपर्यंत भाव देण्यात आला होता. आता मात्र मुगाचे पीक जोमात आलेले असतानाही त्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकार मूगगिळून

परभणी : केंद्रीय आधारभूत किंमतीचा येथील बाजार पेठेत पार पालापाचोळा झाला असून शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या मुगाची खरेदी व्यापाऱ्यांकडून चार हजार रुपयांनी सुरू आहे. तरी सरकार कारवाई करीत नसल्याचा आरोप आहे.