X

कमी-अधिक पावसामुळे पालेभाज्या कडाडल्या

औरंगाबादेत रविवारच्या आठवडी बाजारात कोथिंबिरीची लहानशी गड्डी २० रुपयांना विकली गेली.

कुठे कमी तर कुठे अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले असून आवक मंदावल्यामुळे दर चांगलेच कडाडले आहेत. पालकपासून ते कोथिंबिरीची जुडी १५ ते २० रुपयांपर्यंत होती. औरंगाबादेत रविवारच्या आठवडी बाजारात कोथिंबिरीची लहानशी गड्डी २० रुपयांना विकली गेली. दोन दिवसांपूर्वी ३० रुपये किलोचा कांदा आठवडी बाजारात १५ रुपयांपर्यंत खाली घसरलेला होता.

मराठवाडय़ाच्या अनेक भागात पावसाळा निरोप घेण्याच्या तयारीत आहे. आठवडाभरापासून पाऊस तसा विश्रांतीत आहे. अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. त्यात आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठडय़ापासून ऊनही चांगलेच तापते आहे. असे असताना ज्या गावांमध्ये अत्यल्प पाऊस झाला तेथील भाजीपाला सुकून जात आहे तर जिथे लावला पण अतिपावसामुळे पीक पिवळे पडून वाया गेले. अशा परिस्थितीमुळे जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरापासून पालेभाज्यांची आवक चांगलीच मंदावली आहे. परिणामी पालेभाज्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. रविवारी पालकचा दर १५ रुपये जुडी तर मेथीची जुडी २० रुपयांना होती. शेपू, आंबट चुका, तांदूळजा या भाज्यांची लहानशी जुडी दहा रुपयांना होती. कोथिंबिरीचा दर २० रुपये जुडी असा होता. याबाबत कोथिंबीर विक्रेते रावसाहेब कसबे सांगतात की, बाजारात माल येणे तसे बंद झाले आहे.

अति पावसामुळे काही ठिकाणचे पीक वाया गेले तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस झाला. परिणामी पालेभाज्यांची आवक नाशिक भागातून करावी लागत आहे. प्रति जुडी १६ रुपयांना मला बाजार समितीतूनच खरेदी करावी लागली. आठवडी बाजारात आणेपर्यंत मला ती जुडी १८ रुपयांना पडली. २० रुपयांना मी ती विक्री करतो.

हातगाडय़ांवर भाजीपाला विकणारे अशोक वाघ म्हणाले, माझे गाव चौका शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.

गावात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. जलसाठय़ांमध्ये पाणी साचेल, असा पाऊस झाला नाही. परिणामी पालेभाज्या येणे बंद झाले आहे. त्यामुळे पालेभाज्या कमी प्रमाणात दिसू लागल्या आहेत.

कांदा, टोमॅटो दरात घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत कांद्याचा दर ३० रुपये किलो होता. टोमॅटोही २० ते ३० रुपये किलोपर्यंत होते. मात्र रविवारच्या आठवडी बाजारात कांदा १५ रुपये किलो तर टोमॅटो १० ते १५ रुपये किलोने विकली गेली. कारली, दोडकी अनुक्रमे १० व १५ रुपये पाव किलोप्रमाणे बाजारात होती.

  • Tags: leafy vegetables,
  • Outbrain