औरंगाबादच्या छावणी भागात गॅस्ट्रोने अक्षरशः थैमान घातले आहे. सुमारे १५०० रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, तब्बल ९०० रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. व्हॉल्वच्या दुरूस्तीमुळे छावणी परिसराला औरंगाबाद महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे सैन्य दलासाठी जे पाणी पुरवले जाते तेच पाणी येथील स्थानिकांनाही दिले जाते आहे

. या पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे. पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांत ५०० पेक्षा जास्त रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. उपचारासाठी जागा नसल्याने अनेक रूग्णांना बाकांवर, जमिनींवर किंवा एकाच खाटेवर सलाईन लावण्याची वेळ डॉक्टरांवर आली.