News Flash

अभियांत्रिकी.. विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत

मराठवाडय़ातील केवळ पाच महाविद्यालयांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

बारावीच्या परीक्षेत हमखास गुण मिळवून देणाऱ्या लातूर शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश तळ गाठणारे ठरू लागले आहेत. या वर्षी मराठवाडय़ातील २२ महाविद्यालयांपैकी १७ महाविद्यालयांतील पहिल्या वर्षीच्या प्रवेशाची संख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. लातूर येथील सांदीपानी अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता २७६ एवढी असताना झालेले प्रवेश केवळ आठ एवढे आहेत, तर विलासराव देशमुख महाविद्यालयाची ३४५ असताना केवळ २२ प्रवेश झाले आहेत. औरंगाबाद अभियांत्रिकी महाविद्यालयात केवळ १४ प्रवेश झाले आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षीचे वर्ग जवळपास ओस पडले असून तंत्रनिकेतन उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालये सुरू तरी करता आली असे चित्र दिसून येत आहे. मराठवाडय़ात मोजकी चार-पाच महाविद्यालये वगळता महाविद्यालयांसमोर गुणवत्तेचेही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचे प्रश्न ऐरणीवर येत असले तरी प्रवेश क्षमता तळाशी असणाऱ्या महाविद्यालयांचे करायचे काय, याचा निर्णय मात्र घेतला जात नाही. लातूर येथील ज्या सांदीपानी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षी केवळ आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले त्यांचे अध्ययन-अध्यापन केले जाते काय, त्याचे स्वरूप काय असते याची माहिती जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘आता त्या महाविद्यालयातून राजीनामा दिला आहे, पण प्रवेश कमी झाले आहेत हे खरेच आहे. त्यांची कारणे आता सांगणे चुकीचे होईल.’’ लातूर जिल्ह्य़ातील विलासराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बुके म्हणाले, ‘‘या वर्षी केवळ १३.६२ टक्केच प्रवेश झाले हे खरे आहे; पण येत्या काळात कंपन्यांमध्ये भरती व्हावी एवढय़ा ताकदीचे अभियंते निर्माण करणे यावर काम करावेच लागणार आहे. आम्ही आशावादी आहोत.’’

*   औरंगाबाद शहरातील ‘आयसीसीएम’ अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथील मातोश्री महाविद्यालय येथील प्रवेश क्षमता आणि प्रत्यक्ष प्रवेश याचे प्रमाण केवळ १५ टक्के एवढे आहे. मराठवाडय़ातील बहुतांश महाविद्यालयात रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहेत.

* शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश टक्केवारी अनुक्रमे ९५.८९ आणि ७५.५२ एवढी आहे. ३० टक्के प्रवेश झालेली केवळ पाच महाविद्यालये असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांना नोकरी नसल्याने समस्या वाढत आहेत. या वर्षी कोविडमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळेही प्रवेश प्रक्रिया अधिक किचकट झाली. परिणामी अनेक महाविद्यालयांतून बोटावर मोजता येणारेच प्रवेश झाले.

* दहा टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झालेली चार अभियांत्रिकी महाविद्यालये असून १० ते ३० टक्के प्रवेश असणारी सहा महाविद्यालये आहेत. औरंगाबाद शहरासह मराठवाडय़ातील बहुतांश महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

* करोनाकाळात प्रवेश पात्रता परीक्षेला झालेला उशीर,  निकाल देण्यातील विलंब यामुळेही प्रवेशाचे गणित बिघडलेले होतेच. या वर्षी समस्येत पुन्हा वाढ झाल्याने अभियांत्रिकी क्षेत्रातील अध्यापकांमध्येही भीती दाटलेली आहे; पण ज्या महाविद्यालयातील गुणवत्ता राखली जाते त्यास विद्यार्थीही पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

* औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबरच तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीनेही महाविद्यालय चालविले जाते; पण येथील प्रवेश क्षमताही घटलेलीच आहे. या महाविद्यालयात २४२ पैकी केवळ ५३ प्रवेश झाले आहेत. मंदिर संस्थानच्या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालय चालविण्याऐवजी ते सरकारने ताब्यात घ्यावे, असा प्रस्ताव मंदिर संस्थानच्या वतीने विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:15 am

Web Title: more than 50 per cent admission in only five engineering colleges in marathwada abn 97
Next Stories
1 हिंदुत्वाच्या रिंगणात पुन्हा ‘संभाजीनगर’!
2 आता औरंगाबादमध्येही कास पठार; आठ टेकडय़ा फुलांनी बहरणार
3 विद्युत वाहनांच्या खरेदीचा कल वाढला, पण..!
Just Now!
X