जायकवाडीत ५४.३२ तर येलदरीत पाणी ८९ टक्क्य़ांवर

औरंगाबाद : जून आणि जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे दुष्काळी भाग म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मराठवाडय़ातील प्रमुख सात प्रकल्पांमध्ये ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. पैठण येथील नाथसागरात मंगळवारी सकाळी ८ पर्यंतच्या नोंदीत ५३.७८ टक्के तर परभणीतील येलदरी प्रकल्पात ८९.६९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जायकवाडी परिसरात आतापर्यंत ५३२ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. गतवर्षी ४ ऑगस्टपर्यंत १२४ मिमी पाऊस झालेला होता. बुधवारी सकाळी जायकवाडीची पाणीपातळी क्षमता ४६१.००१ मीटर नोंदली गेली. माजलगाव प्रकल्पात ६३.५३ टक्के पाणी आहे. माजलगाव प्रकल्पात ४३०.२२० मीटर पाण्याची नोंद झाली आहे. या प्रकल्पाच्या परिसरात आतापर्यंत ५५४ मिमी पाऊस पडलेला आहे. गतवर्षी २२६ मिमी पाऊस झालेला आहे.

येलदरी परिसरात मंगळवारच्या तारखेपर्यंत ३८९ मिमी पाऊस झाला असून प्रकल्पात बुधवारी ८९.६९ टक्के पाणीसाठा नोंदला गेलेला आहे. बुधवारी सकाळपर्यंत येलदरीत ४६०.९४० मीटर पाणीपातळी होती. सिद्धेश्वर प्रकल्पात ६२.६४ टक्के, मानार प्रकल्पात ६८.०८ टक्के तर इसापूर धरणात मंगळवारी ५२.४८ टक्के पाणीसाठा होता. मांजरा धरणात बुधवारी उणे ३.१२ टक्के पाणीसाठा होता. तर पाणीपातळी ४३५.३२० मीटपर्यंत होती. विष्णुपुरीत ८६.५३ टक्के तर ३५४.३०० मीटर पाणीपातळी होती. सिना कोळेगाव प्रकल्पात उणे ९६.८४ टक्के, ४८५.७५० पाणीपातळी होती. खडक बंधाऱ्यात १०० टक्के पाणीसाठा झालेला आहे. तर पाणीपातळी ३७४.००० मीटर नोंदली गेली. पैनगंगा प्रकल्पातील पाणीसाठा ५३.१५ टक्के तर पातळी ४३५.९२० मीटपर्यंत असल्याची माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयाकडून मिळाली आहे.

घाणेवाडी जलाशय पूर्ण

जालना : जालना शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलस्रोतांपैकी एक असलेला घाणेवाडी जलाशय पूर्ण भरला आहे. या जलशयाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे.