समृध्द जीवन या चिटफंड कंपनीचा मालक महेश मोतेवारविरुध्द महाराष्ट्रासह ओरिसा पोलिसातही फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपासून हव्या असलेल्या मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी पकडल्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी ओरिसा पोलीस पाच दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. उमरगा न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ताबा देण्यात आला. सकाळी १० वाजता उस्मानाबाद कारागृहातून मोतेवारला ताब्यात घेऊन ते ओरिसाकडे रवाना झाले आहेत.
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील रेवते अ‍ॅग्री कंपनीच्या जागेच्या खरेदीप्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी समृध्द जीवनचा मालक महेश मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी सोमवार, २८ डिसेंबरला पुण्यातून अटक केली होती. मंगळवारी उमरगा येथील सहदिवाणी न्यायालयासमोर त्याला हजर केले असता, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एच. आर. पाटील यांनी आरोपी महेश मोतेवारला ३१ डिसेंबपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ३१ डिसेंबर रोजी मोतेवारच्या छातीत दुखत असल्याने त्याला उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारांसाठी सोलापूरला हलविण्यात आल्याने सुनावणीसाठी पोलिसांना त्यास न्यायालयात हजर करणे शक्य झाले नाही.
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तसे पत्र न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पत्राचा विचार करून मोतेवारला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करून १२-१२ तासांचा तपासणी, उपचार व प्रकृतीतील सुधारणेचा अहवाल सादर करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. २ जानेवारी रोजी दुपारी ससून रुग्णालयाने मोतेवारच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने डिसचार्ज दिला. त्यानंतर उस्मानाबाद पोलिसांनी त्याच दिवशी रात्री उशिरा उमरगा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ओरिसा पोलिसांनी न्यायालयाकडे मोतेवारच्या ताब्यासाठी विनंती केली. न्यायालयाच्या आदेशानंतर उस्मानाबाद कारागृहातून रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ओरिसा पोलीस महेश मोतेवारला अटक करून ओरिसाकडे रवाना झाले.