दारोदार फिरून संकलित करून आणलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतरही उर्वरित उपयोग शून्य कचरा (इनर्ट) साठवायचा कोठे आणि किती, असा प्रश्न महापालिकेपुढे उभा राहिला आहे. प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा आठ ते दहा मेट्रिक टन इनर्ट कचऱ्याचे डोंगर सध्या औरंगाबादेतील दोन्ही घनकचरा प्रकल्पांच्या ठिकाणी साठून पडले आहेत.

शहरातून संकलित केलेल्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्पात वीजर्नििमती केली जाते. औरंगाबादेतील पैठण रोडवरील कंचनवाडी येथे हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून ५ हजार युनिट वीज तयार केली जाते, तर सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतर्नििमती होते. चिकलठाणा व पडेगाव येथील प्रक्रिया प्रकल्पात शहरातील घराघरांमधून दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. सुक्या कचऱ्यातून ३० मेट्रिक टन सिटी कंपोस्ट खत तयार केला जातो.

खतर्नििमतीनंतरच्या कचऱ्यातून आणखी काही घटकांचा निचरा केला जातो. त्यातूनही काही प्रमाणात उपयोगात येणारा आरडीएफ (रिफ्यूज डिराइव्ह फ्यूल) कचरा निघतो. हा आरडीएफ कचरा चंद्रपुरातील सिमेंट कारखान्यात पाठवला जातो. मात्र, त्यानंतरचा कचरा पडून राहिला आहे. त्याचे दोन्ही प्रकल्पांत मिळून आठ ते दहा मेट्रिक टन एवढ्या आकाराचे डोंगर झाले आहेत.

या साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्रपणे पाच ते दहा एकर जमीन लागते. अशी जमीन कोठून उपलब्ध करून घ्यायची, असा एक प्रश्न आहे. या जमिनीत प्रदूषण, पर्यावरण विभागातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली इनर्ट कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते. विशिष्ट आकारात खड्डा खोदून त्यात कचरा, त्यावर मातीचा स्तर देऊन सर्व प्रक्रिया प्रदूषण आणि पर्यावरणालाही घातक होणार नाही, अशा पद्धतीने राबवली जाते. त्यासाठी संबंधित विभागाची परवानगीही आवश्यक असते.

नारेगावात साठलेल्या कचऱ्याचा प्रश्न अजूनही निकाली निघाला नाही. आजच्या स्थितीतही नारेगावात २५ ते ३० लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे. १८८२ पासूनचा हा कचरा पडून असल्याचीही माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रदूषण मंडळाच्या बैठकीत निर्णय

नारेगावातील कचऱ्याचा प्रश्न केंद्र व राज्याच्या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांपुढे होणाऱ्या बैठकीत मांडला जाणार आहे. लवकरच या संदर्भात बैठक होणार असून ४२ एकरांत पडून असलेल्या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची, याविषयी निर्णय होईल, तर पडून कचऱ्याचाही प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे घनकचरा विभागातील निरीक्षकांकडून सांगण्यात आले.