खासदार चंद्रकांत खैरेंची रहाटकरांवरही टीका
मराठवाडा हा संघर्षांतून मिळाला आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोिवदभाई श्रॉफ यांच्यासह अनेकांनी त्यासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे कोणी श्रीहरी सांगतो म्हणून मराठवाडा वेगळा होणार नाही. अणे यांनी आता मराठवाडय़ात येऊन दाखवावे. त्यांना क्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याजवळ माफी लावायला लावू, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यावरही टीका केली.

‘शिवसेना स्टाईल’ म्हणजे काय, हे आता स्वतंत्र मराठवाडय़ाची मागणी करणाऱ्यांना कळेल, असे सांगत खासदार खैरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांवरही बरसले. ‘त्यांना आता का गुदगुल्या होत आहेत, हे समजू शकतो, पण मराठवाडा स्वतंत्र झाला तर विकासासाठी आवश्यक असणार पसा कोठून आणणार, या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी द्यावे,’ असे खैरे म्हणाले.

महाराष्ट्रातील ‘महा’ हा शब्दच नंतर काढावा लागेल. केवळ स्वतंत्र राज्याची निर्मिती करून प्रश्न संपणार नाहीत. मराठवाडय़ात शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्योजक हैराण आहेत, विकासासाठी निधी मिळत नाही, अशा परिस्थितीत नवे राज्य करण्याची कल्पनादेखील वेडगळपणाची ठरेल. यापुढे अणेंना तर मराठवाडय़ात पाऊल ठेवूच द्यायचे नाही, असा शिवसेनेने संकल्प केला आहे. आता ते आले तर त्यांना नाक घासावे लागेल. रझाकारांकडून संघर्षांने मराठवाडा परत मिळविला. तो स्वतंत्र करण्यासाठी नाही. त्यांचा त्याग तरी भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवा. विजया रहाटकर बहिणीसारख्या आहेत. मात्र, केवळ वरिष्ठांना खूष करता यावे म्हणून त्या काही बोलत आहेत. त्यांना नाशिकमध्ये शिवसनिकांनी हिसका दाखविला. तो आता येथेही दाखविला जाईल. मराठवाडा स्वतंत्र करण्याची भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाला शिवसेना स्टाईलने आक्रमक उत्तर दिले जाईल,’ असेही ते म्हणाले.

मा.गो. वैद्य यांना म्हातारचळ

स्वतंत्र मराठवाडय़ाच्या प्रश्नावर मा.गो. वैद्य यांच्यावर टीका करताना खैरे म्हणाले, ‘ते आदरणीय, ज्येष्ठ असले तरी त्यांना आता म्हातारचळ लागले आहे. छोटय़ा राज्यांचा विचार करणे चुकीचे आहे.