News Flash

शिवसेनेकडून पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा

संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नामांतरासाठी शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरली आहे.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी टीव्ही सेंटर चौकात आंदोलन केले.

खासदार खैरे यांचे आंदोलन

शिवसेनेने रविवारी पुन्हा एकदा औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आणला. निवडणुकांपूर्वी शिवसेनेकडून हमखास औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायला हवे, असा मुद्दा पुढे आणला जातो. रविवारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी टीव्ही सेंटर चौकात आंदोलन केले. संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नामांतरासाठी शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. सेनेच्या या आंदोलनावर सामाजिक संकेतस्थळावर टीकाही सुरू झाली आहे. जुन्याच मुद्दय़ांना नव्याने फोडणी देण्याचा हा प्रकार असल्याचे सेनेच्या विरोधकांचे म्हणणे आहे.

कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर जिल्हा बँकांसमोर शिवसेनेने ढोल बजाव आंदोलन केले. त्यानंतर याद्या जाहीर कराव्यात यासाठी सहकार खात्याच्या सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. सरकारच्या बहुतांश निर्णयाला विरोध करत भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दाही शिवसेना आक्रमकपणे आपल्या बाजूने खेचून घेत आहे. रविवारच्या आंदोलनात ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’, अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. आंदोलनाच्या वातावरण निर्मितीसाठी संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती जमलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. पोवाडे लावल्याने आंदोलन लक्षणीय ठरले.

१९९५ साली युतीची सत्ता असतानाही औरंगाबाद शहराचे नामांतर व्हायला हवे, अशी मागणी केली जात असे. अधून-मधून निवडणुकांपूर्वी ही मागणी शिवसेनेकडून पुढे केली जाते. दरवेळी आंदोलनाचा मुद्दा म्हणून शहराचे नामांतर हा विषय हाताळला जातो. रविवारी पुन्हा एकदा खासदार खैरे यांनी स्वत:च्या नेतृत्वाखाली नामांतरासाठी धरणे आंदोलन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:05 am

Web Title: mp chandrakant khaire protest for aurangabad name change
Next Stories
1 पोलीस ठाण्यातील मृत्यूप्रकरणी दोन हवालदार बडतर्फ
2 विद्यार्थ्यांची बोगस नोंद करून फसवणूक
3 पितृछत्र हरवलेल्या मुलीचा लोकसहभागातून पार पडला विवाह
Just Now!
X