एस. टी. बसस्थानक रस्ता ते रेल्वे स्थानकास जोडणाऱ्या रस्त्यावरील उड्डाण पुलाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे असतानाच औरंगाबाद-पुणे रस्त्यावरील छावणी येथील रेल्वे उड्डाण पूल उभारणीचे काम निधीविना थांबले आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही सध्या वेगाने सुरू असून या रस्त्यालगत असलेल्या प्रार्थना स्थळाच्या मुद्दय़ावर सोमवारी (दि. १३) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी १० वाजता लष्करातील ब्रिगेडियर अनुरागसिंह विज, छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोटे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, खासदार खैरे व आमदार संजय शिरसाट आदींच्या उपस्थितीत ही चर्चा होईल. या रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी २५ कोटींची गरज असून राज्य सरकारकडून हा निधी मंजूर होण्याची प्रतीक्षा आहे.
वाढती वाहतूक वर्दळ लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम केले. रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले. गोलवाडी फाटय़ापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणात अडचण येण्याचा प्रश्न नव्हता. मात्र, तेथून पुढे लष्कराची जमीन येत असल्याने त्यांच्या मंजुरीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. लष्कराच्या वरिष्ठ पातळीवर अनेक मिनतवाऱ्या करून रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास जमीन मिळवण्यात आली. छावणीतील रेल्वे उड्डाण पुलाचेही यामध्ये रुंदीकरण केले जाणार आहे. रस्ता चौपदरीकरण बरेच होत असले, तरी या उड्डाण पुलाची उभारणी मात्र निधीविना अजून गती पकडू शकली नाही. हा पूलही चौपदरी होणार असून, त्यासाठी २५ कोटी निधीची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य सरकारकडे या बाबत पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्याशिवाय रेल्वेकडून त्यांच्या हद्दीतील पुलाची उभारणी पूर्ण होऊ शकणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.