‘‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘साई’ यासह महत्त्वाच्या संस्था नागपूरकडे गेल्या. पायाभूत विकासाच्या सर्व सुविधा विदर्भात नेल्या जात आहेत. असे करत शेवटच्या वर्षांत स्वतंत्र विदर्भ करायचा, असा प्रयत्न चालू आहे. सगळेच तिकडे न्यायचे तर मराठवाडय़ाला काय,’ असा टोकदार प्रश्न खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर उपस्थित केला. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत राजकीय भूमिका बाजूला ठेवली असल्याचे सांगत खासदार खैरे यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच अडचणीत आणले. खैरे यांच्या भाषणातील मुद्यांवर आमदार अतुल सावे यांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खैरेनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे चलबिचल निर्माण झाली.
स्वामी रामानंद तीर्थ प्रशिक्षण संस्थेत आयोजित पाण्याविषयीच्या बैठकीत खासदार खैरे तसे उशिरा पोहचले. त्यांनी पाणीप्रश्नी भूमिका मांडावी आणि सर्वपक्षीय लढय़ात उतरावे अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली, त्यानंतर बोलताना खासदार खैरे यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच सुनावले. सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मंदिरे पाडली जात आहेत. मग, सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय दिल्यानंतरही पाणी का सोडले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत शहरातील धार्मिक स्थळे पाडण्याच्या अधिकाऱ्यांच्या कृतीवर टीका केली. ‘सॉरी टू से ताई’ असे इंग्रजीत वाक्य उच्चारत सध्या सरकारी अधिकाऱ्यांवर शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही, असे सांगत पाण्याच्या प्रश्नावरून त्यांनी विकासाच्या प्रश्नाकडे मोर्चा वळविला. मराठवाडय़ावर नेहमीच अन्याय होतो, असे सांगत विविध संस्था नागपूरकडे कशा वळविल्या जातात, हे त्यांनी सांगितले. विशेषत: आयआयएम, स्पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया या संस्था नागपूरकडे वळविली. सर्व पायाभूत सुविधा विदर्भात न्यायच्या आणि युती सरकारच्या शेवटच्या वर्षांत वेगळा विदर्भ करायचा, असा डाव असल्याचे सांगितले. त्यांचे भाषण सुरू असतानाच आमदार सावे यांनी ही बैठक केवळ पाणीप्रश्नासाठी आहे. याची आठवण खैरे यांना करून दिली. हा या व्यासपीठावरचा विषय नाही, असे भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूरही म्हणाले. पाण्यावरच बोलत होतो, असे सांगत खासदार खैरे यांनी भाजपच्या नेत्यांना बैठकीत चांगलेच सुनावले. यावर भाष्य करताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘उठून उभारल्यावर माणूस जरा आक्रमक होतो, त्यामुळे बसूनच बोलते’. खासदार खैरे यांनी उभे राहून भाषण केले होते, त्याचा संदर्भ या वाक्याला होता. ‘एखादा प्रकल्प विदर्भात गेला तरी जाऊ द्या, मराठवाडय़ाची अडचण असणाऱ्या पाणीप्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी विनंती आपण करू आणि सर्व प्रश्न त्यांच्यापर्यंत नेऊन सोडविण्याचा प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या.’