19 October 2019

News Flash

पूर्वीच काळजी घेतली असती तर, कुरघोडय़ा थांबल्या असत्या!

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर पद्मसिंहांचा टोला

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर पद्मसिंहांचा टोला

औरंगाबाद : राष्ट्रवादीतील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्वीच काळजी घेतली असती, तर पक्षांतर्गत कुरघोडय़ांना वेळीच पायबंद घातला गेला असता व पक्षावर कदाचित आजची वेळ आली नसती, अशा शब्दांत डॉ. पद्मसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सुनावले. राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी डावलले आणि ते त्यांच्या मुलाने सहन केले, अशा आशयाचे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. ते ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाल्यानंतर त्या प्रवेश प्रक्रियेवर प्रकाश टाकत डॉ. पद्मसिंह पाटील यांनी लेखी पत्रकातील शेवटच्या दोन ओळीत राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोडय़ांवर भाष्य केले आहे.

सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत १ सप्टेंबर रोजी राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी ३१ ऑगस्ट रोजी परिवार संवाद मेळाव्यात राणाजगजितसिंह पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीस माझे आशीर्वाद असल्याचे जाहीर केले होते. आजपर्यंत माझ्या पाठीशी जसे खंबीरपणे उभे राहिलात, तसेच कार्यकर्त्यांनी पुढेही राणाजगजितसिंहांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले होते. २०१४ पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी सक्रिय राजकारणात नाही, हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह सर्वाना माहीत आहे. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे मी सोलापूरला जाण्याचा विषयच उद्भवत नव्हता. हे खासदार सुप्रिया सुळे यांना माहीत असतानाही त्यांनी माझा पक्षप्रवेश रोखला, असे केलेले विधान खेदजनक असल्याचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेले विधान जर सत्य असते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणाजगजितसिंह यांना गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कशाला दिला असता, असा सवालही डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे आपल्याला मुलीसारख्या आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या काळजीचा आनंद आहे. मात्र त्यांनी व्यक्त केलेली काळजी वस्तुस्थितीला धरून नाही, असे डॉ. पाटील यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे.

First Published on September 14, 2019 4:02 am

Web Title: mp padamsinh patil criticised mp supriya sule for her statement zws 70