News Flash

Ravindra Gaikwad : ‘गायब’ खासदार दिसले ते थेट टीव्हीवरच!

‘हवेतल्या मर्दुमकी’ने माजी प्राचार्य रवींद्र गायकवाड चर्चेत

खासदार रवींद्र गायकवाड

हवेतल्या मर्दुमकीने माजी प्राचार्य रवींद्र गायकवाड चर्चेत; मतदारसंघाकडे दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप

‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ या शब्दामध्ये ज्यांची ओळख सांगितली जात होती ते खासदार रवींद्र गायकवाड Ravindra Gaikwad अचानक काल झळकले ते विमानातील मारहाणीतच. निवडून आल्यापासून ते गायब आहेत. कोणाशीच संपर्कात नसतात, असे सांगणारे त्यांच्या पक्षात अधिक आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तर खासदारांचे दर्शन होत नसल्याने ‘ते कोठे आहेत’, असा प्रश्न विचारणेही मतदारांनी सोडून दिले होते.

केंद्र सरकारच्या कोणत्याही आढावा बैठकीला जिल्हय़ात खासदार रवींद्र गायकवाड Ravindra Gaikwad दिसत नाहीत, असा आरोप केला जात आहे. विमानात त्यांनी केलेला उद्दामपणा हा त्यांचा स्वभाव नाही, असे सांगत तुळजापूरमधील काही शिवसैनिकांनी रवींद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी आंदोलन केले. देशात आणि राज्यात गाजणाऱ्या या घटनेच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ नेहमीच लोकप्रतिनिधींच्या गैरकृत्यामुळे झळकतो. खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाच्या षडयंत्राचा आरोप झाला, तर आता निवडून आलेले रवींद्र गायवाड यांची ओळखही हाणामारी करणारा लोकप्रतिनिधी अशी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावे म्हणून आवाहन केले होते. खासदार गायकवाड यांनी खसगी हे गाव आदर्श करण्यासाठी निवडले. पण दोनदा चक्कर मारुन गेलेले खासदार पुन्हा परतलेच नाहीत, असे खसगीमधील नागरिक सांगतात. त्यांना भेटणे अथवा त्यांच्याशी संपर्क होणे हेच एक आव्हान असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांच्याकडून मतदारसंघातील नागरिकांचे काम होण्याची शक्यता नाही, असे सांगण्यात येते. अचानक न दिसणारे खासदार टीव्हीमध्ये दिसल्याने ते दिल्लीमध्ये जातात हे तरी समजले, अशी समंजस प्रतिक्रिया एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने दिली. मतदारसंघात मात्र रवींद्र गायकवाड यांच्यावर हाणामारीचे तसे गुन्हे नाहीत. काही राजकीय स्वरुपाचे गुन्हे दाखल असले तरी थेट अंगावर धावून जाणे असे त्यांनी केले नव्हते. महाविद्यालयात प्राध्यापक असणारे गायकवाड दिसतही नाहीत आणि बोलतही नाहीत, असे उस्मानाबादहून अनेकजण सांगतात.

खासदार गायकवाड हे दिल्लीत दुसऱ्यांदा गाजले. अडीच वर्षांपूर्वी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जेवणाच्या दर्जावरून गोंधळ झाला होता. तेव्हा शिवसेनेच्या खासदारांनी रोझा करणाऱ्या एका मुस्लीम कर्मचाऱ्याला जबरदस्तीने चपाती भरविण्याचा प्रयत्न केला होता. राजन विचारे यांच्यासह खासदार गायकवाड हे सुद्धा या वादात अडकले होते. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतरही त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचे सोडून आपण केले ते योग्यच केले, असा उद्दामपणा केला.

महाविद्यालयात प्राचार्यपद भूषविताना त्यांनी काही विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. यावरून विद्यार्थ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली होती. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भाजपच्या एका नेत्यालाही गायकवाड यांनी दमबाजी केली होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांनी तत्कालीन खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. यापूर्वी गायकवाड यांनी दोनदा आमदारकीही भूषविली आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ नेहमीच लोकप्रतिनिधींच्या गैरकृत्यामुळे झळकतो. खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाच्या षडयंत्राचा आरोप झाला, तर आता निवडून आलेले रवींद्र गायवाड यांची ओळखही हाणामारी करणारा लोकप्रतिनिधी अशी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावे म्हणून आवाहन केले होते. गायकवाड यांनी खसगी हे गाव आदर्श करण्यासाठी निवडले. पण दोनदा चक्कर मारुन गेलेले खासदार फिरकले नाहीत, असे स्थानिक सांगतात.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार गायकवाड यांच्या मुलगा किरण यांचा दारुण पराभव झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:27 am

Web Title: mp ravindra gaikwad attacks on air india officers
Next Stories
1 स्वतंत्र मराठवाडय़ाच्या मागणीला विरोध
2 श्रीहरी अणे यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक
3 सत्ता सारीपाटात भाजप हरली, सेना जिंकली
Just Now!
X