13 November 2019

News Flash

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांविरुद्ध खासदार सुनील गायकवाड आक्रमक

लातूरचा पाणीप्रश्न जगभर गाजत असताना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले व महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग हे पुरेशा गांभीर्याने काम करीत नाहीत.

लातूरचा पाणीप्रश्न जगभर गाजत असताना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले व महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग हे पुरेशा गांभीर्याने काम करीत नाहीत. त्यांनी आपल्या कामात सुधारणा केल्या नाहीत, तर दोघांच्याही बदलीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहावर आयोजित सुकाणू समितीत ते बोलत होते. आमदार अमित देशमुख, मकरंद सावे, मोईज शेख, महापौर अख्तर शेख आदी या बठकीस उपस्थित होते.
लातूर शहराचा पाणीप्रश्न गंभीर आहे. केंद्र व राज्य सरकार या प्रश्नात लक्ष घालत आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी रेल्वेने पाणी आणण्याची गरजच नव्हती, उपलब्ध पाणीसाठा पावसाळय़ापर्यंत पुरेल असा दावा करीत आहेत. ही बाब चुकीची असून मिळालेले पाणी शहरवासीयांना योग्य पद्धतीने वितरीत करण्यात महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग कमी पडत आहेत. या दोघांनीही आगामी काळात यंत्रणेतील दोष दूर करण्याची गरज आहे. हे दोष दूर झाले नाहीत तर नाइलाजाने मुख्यमंत्र्यांकडे यांच्या बदलीची मागणी करण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला.
शहरात महापालिकेचे ७० व स्वयंसेवी संस्थांचे ५८ टँकर पाणी वितरीत करीत आहेत. अजूनही कोणत्या प्रभागात किती दिवसांनी पाणी दिले जाते, या बाबत प्रशासन अधिकृत माहिती देत नाही. पाच दिवसांपासून ते २५ दिवसांपर्यंत लोकांना एकदा पाणी मिळते. पाणी वितरणातील हे दोष दूर केले पाहिजेत. आता शहराला पाणी उपलब्ध होत असताना हे दोष दूर करण्याची यंत्रणा मार्गी लावा, अशा सूचना आमदार देशमुख यांनी बठकीत दिल्या. मॅजिकपीठने जे घरातील पाणी मुरवतील अशांना महापालिकेद्वारे १ हजार रुपये अनुदान दिले जावे, अशी सूचनाही बठकीत करण्यात आली. नागरिकांना पाणी वितरीत करताना त्याची तपासणी करून ते पिण्यालायक आहे याची खात्री करूनच दिले जावे, असेही ते म्हणाले.
छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी शहरात स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने प्रत्येक प्रभाग एका संस्थेला देखरेखीसाठी दत्तक देण्याची सूचनाही बठकीत पुढे आली. शहरातील १७ प्रभागांत खासदार गायकवाड यांच्या निधीतून िवधनविहिरी घेण्यात आल्या. सर्व ठिकाणी ३-४ इंच पाणी लागले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. हे पाणी समन्यायी पद्धतीने वितरीत व्हावे, या साठी मनपाने लक्ष घालावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

First Published on April 16, 2016 1:10 am

Web Title: mp sunil gaikwad aggressive against collector corporation commissioner