21 September 2020

News Flash

रेल्वेप्रश्नी खासदार सुनील गायकवाडांची पंचाईत

उदगीरनंतर आज लातूर बंदची हाक

खासदार सुनील गायकवाड

लातूर एक्स्प्रेसवरून दोन्ही बाजूंच्या नाराजीचा सामना; उदगीरनंतर आज लातूर बंदची हाक

लातूर एक्स्प्रेस आठवडय़ातून तीन दिवस बिदपर्यंत विस्तारीकरण करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या विरोधात लातूरकरांनी शुक्रवारी शहर बंदचा निर्णय घेतला असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांबरोबर मराठवाडा जनता विकास परिषद, रेल्वे संघर्ष समिती अशा सर्वानीच एकजूट दाखवली आहे. या रेल्वे प्रश्नात लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांची पंचाईत झाली आहे. गाडीला विरोध केला तर उदगीरकर, विरोध नाही केला तर लातूरकर नाराज होणार असल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी, असा प्रश्न खासदार गायकवाड यांच्यासमोर उभा राहिला, मात्र त्यातूनही त्यांनी ‘नरो वा कुंजरो वा’ प्रमाणे मार्ग काढला आहे.

लातूरहून मुंबईला जाणारी एकमेव रेल्वे विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. बऱ्याच वर्षांनंतर लातूरहून थेट मुंबईला जाण्याची सोय झाल्यामुळे ही रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरली. दीडशे टक्के क्षमतेने ही रेल्वे सुरू असताना लातूरकरांची गरसोय होत आहे. रेल्वेने या गाडीला अतिरिक्त डबे जोडावेत, अशी मागणी प्रवाशांची होत असतानाही ती मागणी मान्य न करता आठवडय़ातून तीन दिवस ही रेल्वे बिदपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी आपले वजन खर्ची घालून ही मागणी पदरात पाडून घेतली. लातूरचे खासदार सुनील गायकवाड हे कात्रीत सापडले आहेत. गाडीला विरोध केला तर उदगीरकर नाराज व विरोध नाही केला तर लातूरकर नाराज. हे दोघेही त्यांच्या मतदारसंघातीलच. त्यामुळे अतिरिक्त रेल्वे सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याची भूमिका मांडत त्यांनी ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतली आहे.

लातूर एक्स्प्रेस ही लातूरकरांची अस्मिता बनल्यामुळे सर्वच जण या रेल्वेच्या विस्तारीकरणास विरोध करत आहेत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, मात्र लातूरकरांनी तो हाणून पाडला होता. आता लातूरकरांच्या सोबतीला पहिल्यांदाच उस्मानाबादकर धावून आल्यामुळे लातूर एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाचा विरोध दुपटीने वाढला आहे. रेल्वे प्रशासन जनतेच्या भावनांची दखल घेणार की नाही, असा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे.

उदगिरात कडकडीत बंद

मुंबई-लातूर एक्स्प्रेस रेल्वेचे बिदपर्यंत आठवडाभर विस्तारीकरण करावे, हैदराबाद-पुणे रेल्वेसेवा आठवडय़ातील सर्व दिवस सुरू करावी, यशवंतपूर (बंगळूरु) ते बिदर ही गाडी लातूपर्यंत विस्तारित करावी, आदी मागण्यांसाठी उदगीरवासीयांनी दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या सर्व राजकीय पक्षांबरोबरच विविध स्वयंसेवी संस्थांनीही बंदला पाठिंबा दिला. लातूरची रेल्वे उदगीर माग्रे गेल्यामुळे जळकोट, उदगीर, देवणी, अहमदपूर, चाकूर, आदी तालुक्यांतील लोकांना मुंबईपर्यंत जाण्याची चांगली सोय होणार आहे. त्यामुळे सर्वच मंडळी या बंदमध्ये सहभागी होती. लातूरकरांनी लातूर एक्स्प्रेस विस्तारीकरणास विरोध केल्यानंतर उदगीरची मंडळी संतप्त झाली आहेत. लातूरकरांच्या भूमिकेच्या विरोधात आवाज उठवत उदगीरकरांनी एकजूट दर्शवली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:41 am

Web Title: mp sunil gaikwad on latur express
Next Stories
1 तीन लाख ३५ हजार क्विंटल तुरीची खरेदी अजून बाकी
2 औरंगाबादकरांनो सावधान!; तुमच्या वाहनांवर ‘स्पीड गन’ची नजर
3 ‘किया’ मोटर्स आंध्र प्रदेशात!
Just Now!
X