पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, आठ कोटी गॅस जोडणीची ध्येयपूर्ती  

मुद्रा योजना, दीनदयाळ कौशल्य विकास अभियानातून महिलांना अधिक लाभ होत आहे. ‘मुद्रा’ योजनेतून दिलेल्या २० कोटी लाभार्थीपैकी १४ कोटी महिला आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.

मुद्रा योजनेतून महिलांना उद्योग करण्यास दिलेला वाव, जनधन खाते असलेल्या बचत गटांतील महिलेला कर्जरुपाने देण्यात येणारे पाच हजार रुपये आणि घराला घरपण देणाऱ्या सुविधांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यावेळी पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेची उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या आठ कोटीव्या गॅस जोडणीची कागदपत्रे औरंगाबाद येथील आयेशा रफिक शेख यांच्या हाती सोपवली.

प्रमुख कार्यक्रम उद्योग क्षेत्रातील ‘ऑरिक हॉल’च्या उद्घाटनाचा होता. परंतु पंतप्रधानांनी विकासाच्या केंद्रस्थानी महिलाच असल्याचा संदेश देत दुष्काळ दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हाती घेतलेल्या योजनांचे कौतुक केले.

देशात मंदी असल्यामुळे पंतप्रधान काय बोलतात, याची उत्सुकता उद्योग जगतात होती. मात्र ‘डीएमआयसी’ प्रकल्पामुळे सुविधा वाढतील आणि या भागाला ‘ऑरिक सिटी’तून लाभ होईल असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचबरोबर देशातील उद्योगाच्या केंद्रस्थानी ‘ऑरिक’ असेल असे प्रतिपादन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटातील महिलांशी संवाद साधताना मोदी यांनी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या योजनांमधील महिलांना लाभदायक योजनांचा ऊहापोह केला. तो करताना त्यांनी दिवंगत समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘स्वच्छतागृह आणि पाणी या दोन समस्यांनी महिलांना ग्रासलेले असते. १९७०च्या दशकात त्यांनी सांगितलेला हा प्रश्न सोडवता आला नाही. ते आता हयात नाहीत. त्यांनी या समस्या मांडल्यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली, पण काहीही काम झाले नाही. आम्ही आता या समस्या सोडविण्याचा संकल्प केला आहे.’’ स्वच्छतागृहांची समस्या आता जवळपास सोडविली आहे. देशात काही महिन्यांत प्रातर्विधीसाठी उघडय़ावर जाण्याची वेळ कोणावर येणार नाही, एवढे काम झाल्याचा दावाही त्यांनी केला. पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी कसे पाणी आणले जाईल याची मुख्यमंत्र्यांनी दिलेली दिशा योग्य असल्याचे सांगत त्यांनी जलसंचाल योजनेचे कौतुक केले.

‘मुद्रा’ योजनेतून दिलेल्या २० कोटी लाभार्थ्यांपैकी १४ कोटी महिला असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी भाषणात केला. २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला पक्के घर देण्याचा संकल्प शासनाने केला आहे, तो पूर्ण केला जाईल, या त्यांच्या घोषणेचा पुनरुच्चारही पंतप्रधान मोदी यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचेही या वेळी भाषण झाले. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्यभरातून एक लाख महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार आणि अभिनंदन करणारे फलक मराठवाडय़ातील आमदारांसह कार्यकर्त्यांनी हाती धरले होते. ऑरिक हॉलचे उद्घाटन हा मुख्य कार्यक्रम असल्याचे चित्र काही दिवस आधी होते. प्रत्यक्षात महिला बचत गटातील सदस्यांची संख्या अधिक असल्याने औद्योगिक वसाहतीमधील कार्यक्रमात महिलांच्या योजनांवर अधिक चर्चा झाली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाली तेव्हा दारिद्रय़रेषेखालील पाच कोटी लोकांना गॅस जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. त्यात वाढ करण्यात आली. आठ कोटी हे उद्दिष्ट सात महिने आधीच पूर्ण केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

मोदी है तो मुमकीन है! वॉटर ग्रीड आणि कोकणातून पाणी आणण्याच्या योजनांचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मराठवाडय़ासाठी जाहीर केलेल्या घोषणांसाठी निधी कोठून येईल, असा प्रश्न विचारला जातो. पण काळजी करू नका, मोदी है तो मुमकीन है. मराठवाडय़ाच्या योजनांसाठी केंद्राकडून निधी मिळावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्राला मोठा वाटा – मोदी

पाच लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय साध्य करण्यासाठी २१ शतकातील पायाभूत सुविधांची शहरांना गरज आहे. दळणवळण, संपर्क, उत्पादकता, श्वाश्वतता आणि सुरक्षा या घटकांच्या माध्यमातून ते साध्य होऊ शकेल. त्यासाठी देभभरात आधुनिक पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातील मोठा वाटा महाराष्ट्राला मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जाहीर केले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनेक मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजनाच्या मुंबईतील कार्यक्रमात मोदींनी ही घोषणा केली.