19 January 2021

News Flash

मराठवाडा पदवीधरमध्ये बहुरंगी लढत

नाराजी तसेच जातीच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

मराठवाडा विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार असली तरी बंडखोर रमेश पोकळे, वंचित बहुजन पार्टी आणि एमआयएम या दोन्ही पक्षाने उमेदवार उभे केले असल्याने मतांचे जातीय ध्रुवीकरण आणि पसंती क्रमांक यावरून आता गणिते घातली आहेत. सलग तिसरा विजय राष्ट्रवादीच्या वाटय़ाला येतो की भाजप पुन्हा हा मतदारसंघ खेचून घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा वापरून पोकळे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये केलेली बंडखोरी भाजपला भोवणार की मतांच्या विभाजानासाठी कामी येणार, यावरही तर्क वितर्क लढविले जात आहेत. पोकळे यांच्या बंडखोरीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिरीष बोराळकर हेच अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र नव्याने काढावे लागले आहे. बंडखोरी केल्यानंतर रमेश पोकळे यांच्यावर कारवाई होण्याऐवजी ते भाजपचे उमेदवार नाहीत, याची नोंद घ्यावी एवढय़ा मोजक्या शब्दात प्रदेशाध्यक्षांनी काढलेले पत्र ‘ रणनीती’ भाग असल्याचेही सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र प्रचारात एकत्रित असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या टप्प्यात देण्यात आला. तर भाजपमध्ये उमेदवारीवरून गोंधळ असल्याचेच चित्र दिसून आले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील सहनोंदणीप्रमुख काम करणारे प्रवीण घुगे यांना आणि रमेश पोकळे यांना डावलण्यात आल्यानंतर या निवडणुकीत उमेदवारी दिल्यानंतर अधिकृत उमेदवार कोण हे पुन्हा पत्र काढून भाजप प्रदेशाध्यक्षांना सांगावे लागत आहे. हे पत्र भाजपमधील खदखद सांगण्यास पुरेसे आहे.

मराठवाडय़ातील प्रत्येक निवडणुकीमध्ये जातीची गणिते उघडपणे चर्चेत असतात. पदवीधर निवडणुकीमध्येही त्यांची चर्चा सुरू झाली आहे. पण या वेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. प्राध्यापक नागोजीराव कुंभार यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे दौरा केला. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीनेही उमेदवार रिंगणात आहे. करोनाकाळात सुरू असणारा प्रचार पदवीधरांऐवजी पक्षीय आरोप-प्रत्यारोपाचा अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक नेत्याला आपला उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवावा असे वाटू लागल्याने रंगत वाढेल असे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वेळा या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण यांना यश आले. हा आठ जिल्ह्य़ातील मतदारसंघ असल्याने अधिक व्यापक संपर्क असणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत किती संख्येने घेऊन येतील, यावर बरीच गणिते ठरविण्याची शक्यता आहे.

 प्रचारातून प्रमुख मुद्दे गायब

मराठवाडय़ातील पदवीधरांचे प्रश्न म्हणजे शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर यांच्यासह विविध व्यवसायातील पदवीधारकांचे प्रश्न असे मानले जाते. वास्तविक केद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने चर्चेत येतील किंवा आणले जातील असे अपेक्षित होते. महापोर्टलचा गोंधळ, शिक्षक अनुदानाचे प्रश्न, शिक्षक पात्रता परीक्षांचा खेळ असे विषय निवडणूक रणधुमाळीतून गायब आहेत. राजकीय टीका करण्यावरच प्रचारात भर आहे.

थोडे डिजिटल थोडी पोस्टरबाजी

करोनाकाळात मुखपट्टी लावणारे कार्यकर्ते एकत्र यावेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक डिजिटल सभा नुकतीच पार पडली. पदवीधर शिक्षणाचा आणि उद्योगाचा संबध जोडत ५० हजार कोटीची सामंजस्य करार केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. चव्हाण यांच्या प्रचारात प्रत्येक जिल्ह्य़ात सभा घेतल्या जात आहेत. त्यात धनंजय मुंडे यांच्याही सभा झाल्या. प्रचारात फेसबुक आणि डिजिटल मजकुराबरोबरच शहरात काही अपक्षांनी पोस्टरबाजी केली आहे. पण गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र लावून रमेश पोकळे मैदानात उतरले आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील डॉक्टर, वकील, उद्योजकांबरोबर सोमवारी पदवीधर प्रचाराच्या अनुषंगाने संवाद साधला.

पोकळे यांच्या उमेदवारीची चर्चा

रमेश पोकळे यांचा प्रचार गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा वापरून केला जात आहे. त्यामुळे भाजपची मते घटतील काय, या भीतीमधून शिरीष बोराळकर हेच अधिकृत उमेदवार असल्याची नोंद कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्र काढून म्हटले आहे. बंडखोर पोकळे यांना पक्षातून काढण्याची कारवाई न करता केवळ नोंद घेण्याविषयीचे पत्र रणनीतीचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

संस्थात्मक प्रचार आणि जयसिंगरावांची भर

मराठवाडय़ातील बहुतांश शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा प्रभाव आहे. त्यामुळे संस्थात्मक प्रचारावर राष्ट्रवादीकडून जोर दिला जात आहे. शिक्षक, प्राध्यापक मंडळीही प्रचाराच्या पातळीवर कामावर लागली आहेत. त्यात भाजपमध्ये असूनही अनेक दिवस विजनवासात असणारे जयसिंगराव गायकवाड गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून टीका करत आहेत. सतीश चव्हाण यांच्या प्रचारात दौरे करत भाजपमध्ये होणारी कुचंबणा सांगत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांच्या प्रचारात उतरत आरोप करणारे जयसिंगराव गायकवाड नेहमीच ‘अस्वस्थ’ असणाऱ्यांमध्ये गणले जातात अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जिल्हानिहाय मतदारांची संख्या

औरंगाबाद   १०६५००

जालना  २७९९०

परभणी ३२७३५

हिंगोली १६७७४

नांदेड   ४९३६५

लातूर   ४१२४९

उस्मानाबाद  ३३६३६

बीड ६३४३६

एकूण   ३७३४८५

या मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण खूपच कमी आहे.  दोन लाख ८६ हजार ५४३ पुरुष मतदार आणि केवळ ८६ हजार ९३७ महिला मतदार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2020 12:13 am

Web Title: multi struggle among marathwada graduates constituency abn 97
Next Stories
1 अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात!
2 ‘राज्यात गेल्या आठ महिन्यांत ५० हजार कोटींचे करार’
3 औरंगाबाद : बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्राचा दुर्देवी मृत्यू
Just Now!
X