माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी असलेल्या परिसरात गेल्या २५ दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने संतप्त महिलांनी विरोधी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी नगरपालिका कार्यालयास कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
पालिकेवर माजी आमदार बोर्डीकर यांची सत्ता असतानाही त्यांच्याच निवासस्थान परिसरात पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे २५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. नदीच्या वरच्या बाजुला हुतात्मा स्मारक, संभाजीनगर, शिवाजीनगर, बलसा रोड, चपराशी कॉलनी, बोर्डीकर निवासस्थान या भागात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. जिंतूर शहराला जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असल्याने नवीन योजना मंजूर करण्यात आली. परंतु अजूनही या योजनेचे काम पूर्ण झाले नाही. या योजनेंतर्गत शहरात जलवाहिनी टाकताना पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता हे पद रिक्त होते. आजही हे पद भरण्यात आले नाही.
उलटय़ा नदी परिसरात जलवाहिनी टाकली नाही. त्यामुळे या भागाला अजून पाणी पोहोचले नाही. या उलट नदीच्या खालच्या भागात आठवडय़ातून दोन-तीन वेळा पाणी येते. २५ दिवस झाले पाणी आले नसल्याने सोमवारी महिलांचा संताप अनावर झाला. विरोधी नगरसेवक कपिल फारुखी, मनोज डोईफोडे, अॅड. विनोद राठोड यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी दुपारी पालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकून मुख्याधिकारी राम बोरगावकर यांना घेराव घातला. नायब तहसीलदार सुगंधे यांनी मध्यस्थी केल्यावर कुलूप उघडण्यात आले.