औरंगाबाद येथील हर्सूल परिसरातील फातेमानगर भागात रविवारी दुपारी व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकल्यामुळे झालेल्या वादातून २० ते २५ जणांच्या जमावाने एकाची हत्या केली. मोईन महेमूद पठाण (३५, रा. हर्सूल) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याला बेदम मारहाण करून तलवारीने भोसकले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

मोईन हा प्लॉटिंग एजंट आहे. त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींचे आणि त्याचे अनेक दिवसांपासून वाद होते. रविवारी व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट टाकल्याने वादाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास काही लोक मोईनच्या घरी आले. त्यांनी त्याला बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर हर्सूलच्या फातेमानगर भागात नेले. तेथे २० ते २५ जणांनी लाकडी दांडा आणि तलवारीने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून मोठी गर्दी जमा झाली. भीतीमुळे मोईनला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मोईनसोबत असलेला त्याचा भाचा इरफान रहीम शेख (२५, रा. हर्सूल) देखील गंभीर जखमी झाला. मोईन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला तरी त्याला मारहाण सुरूच होती. तो बेशुद्ध होताच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याला तत्काळ उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.