औरंगाबाद : राज्याला म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी ९ हजार ३७४ अँफोटेरेसिन बी या इंजेक्शनचा १० ते १५ जूनदरम्यान पुरवठा करण्यात आला आहे. यातील ९६ इंजेक्शन शिल्लक असल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली.

राज्यातील १२ जिल्ह्यात आतापर्यंत म्युकोरमायकोसिसचे एकूण २ हजार २६ रुग्ण आढळले. त्यांच्यापैकी १ हजार ३३ रुग्णावर उपचार चालू आहेत. तर ७८१ रुग्ण बरे झाले असून १८४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. रवींद्र घुगे यांच्यापुढ सादर केली.

नुकतेच करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर म्युकोरमायकोसिस बद्दल कोणीही विचार केला नाही. येथे सुपर स्पेशालिटी वॉर्ड, सोयी सुविधा आणि वैद्यकीय उपचाराची यंत्रणा आहे. केवळ पूर्ण वेळ तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे गरीब रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत, याकडे खासदार इम्तियाज जलील यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. करोनाची तिसरी लाट आली तर तिला तोंड देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची तयारी आहे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी रुग्णांना बाहेरून खासगी रुग्णालयातून चाचण्या कराव्या लागत होत्या. अशाप्रकारे खासगी रुग्णालये वाढविण्यासाठी अप्रत्यक्ष  मदत केली जात होती, असे ते म्हणाले. घाटी रुग्णालयातील सोई सुविधा आणि यंत्र सामग्रीबाबत उपस्थित केलेल्या विषयावर स्वतंत्र जनहित याचिका दाखल करण्याची मुभा देत सुओमोटो जनहित याचिकेत खंडपीठाला त्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. आजच्या सुनावणीत न्यायालयाचे मित्र अ‍ॅड. सत्यजित बोरा यांनीही बाजू मांडली. पुढील सुनावणी २८ जून रोजी होणार आहे.