रावसाहेब दानवे यांचा शरद पवार यांना टोला

समृद्धी मार्गासाठी पाचपट दर दिला जात असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी चालविलेला विरोध पोटशूळ असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. नुकतेच औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी औरंगाबाद येथे ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांची परिषद औरंगाबाद येथे घेतली होती, या पाश्र्वभूमीवर रावसाहेब दानवे बोलत होते. केवळ शरद पवारच नाही तर सर्व नेत्यांनी याचा विचार करावा, असे ते म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामातील अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी दानवे सोमवारी आले होते.

पुणे-सांगली रस्ता तयार करताना केवळ एकपट भाव देऊन रस्ता करण्यात आला. मग विदर्भ आणि मराठवाडय़ातील महत्त्वपूर्ण रस्त्यांबाबत का विरोध होतो, असा सवालही त्यांनी केला. या रस्त्यामुळे मुंबई-नागपूरचा प्रवास कमी वेळात असल्याने विकासाचा वेग वाढेल, असा दावा त्यांनी या वेळी केला. शेतकरी कर्जमाफीमध्ये ८५ टक्के शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे. चालू थकबाकीदारांना शासन निर्णयानुसार २५ हजार लाभ देण्याची योजनेची संपलेली मुदत वाढवून देण्यात येणार आहे. तसा शासन निर्णय लवकरच निघणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. ३० जून २०१७पर्यंत जे शेतकरी त्यांच्याकडील कर्जाची एकमुश्त रक्कम बँकांमध्ये भरू शकतील, अशा शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचा लाभ देण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली होती. शासन निर्णय निघाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोन दिवस राहणार होते. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहतील, अशा तक्रारी जिल्हा बँकेच्या प्रशासनाने केल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर मुदत वाढवून देण्याचा शासन विचार करीत असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय घेत आहेत. याविषयी बोलताना दानवे म्हणाले, की हा श्रेय घेण्याचा विषय नाही. शेतकरी आणि सरकारचे कर्जमाफीमध्ये श्रेय आहे. दानवे यांच्या ‘साले’ विषयावरून शिवसेना त्यांच्यावर कडवट टीका करीत आहे. यावर दानवे यांना विचारले असता, ‘टीकाटिप्पणी चालू असते. कधी ते आमच्यावर करतात, कधी आम्ही त्यांच्यावर करतो.’ एवढेच ते म्हणाले.

भाजपकडून सुरू असणाऱ्या विस्तारक योजनेचीही त्यांनी माहिती दिली. ९० हजार मतदान केंद्रासाठी राज्यभरात १५ हजार विस्तारक पाठवण्यात आले आहेत.

या पक्षाच्या योजनेंतर्गत भाजपकडून जातिनिहाय आखणी केली जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. पक्षाकडून जातिनिहाय माहिती घेत असल्याचे विचारले असताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘केवळ जातिनिहाय माहिती घेतोय असे नाही तर गावाचा रेशन दुकानदार कोण, पोलीस पाटील कोण, अशी माहितीही गोळा केली जात आहे. माहिती लागते हो.’

रावसाहेबी आदर्श’.. चूक काहीच नाही

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जोमाळा येथील शाळा ही मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचे ठरविण्यात आले होते. या शाळेची इमारत पूर्ण करण्यात आली. मात्र, ही योजना सरकारने पुढे रद्द केली. त्यामुळे इमारत पडून राहू नये म्हणून संस्थेच्या वतीने इमारत भाडेतत्त्वावर मिळावी, अशी मागणी केली होती. आमच्या मतदारसंघात आम्ही शाळा चालवायची नाही काय? त्या शाळेत आमची मुले थोडीच शिकतात? आम्ही संस्थाचालक आहोत. त्यामुळे मागणी केली होती. किनवटमधील अशोक सूर्यवंशी नावाच्या कार्यकर्त्यांने दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना येथे या शाळेत शिकवण्यास सुरुवात केली होती. पाटी, पेन्सील आणि पुस्तकाचा कोणताही खर्च न आकारता तो मोफत शिक्षण देत होता. त्याला हातभार लागावा म्हणून ही मागणी केली. आता माझे नाव लागल्यावर त्याला नाहकच वेगळे वळण लागले असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. ‘लोकसत्ता’तील वृत्तामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, असेही ते म्हणाले.