देवगिरी महाविद्यालयाने नॅकच्या तृतीय मूल्यांकनात चारपैकी सरासरी ३.७५ गुण संपादन केले. २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान दिलेल्या भेटीत नॅक समितीने महाविद्यालयाच्या संचालक मंडळासोबत व्यवस्थापनाचा गौरव केला. नॅक समितीने महाविद्यालयाच्या प्रगती विषयी विशेष उल्लेख केलेल्या बाबी आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत सांगितल्या.
महाविद्यालयाचा परिसर, आधुनिक दर्जाच्या प्रयोगशाळा व ग्रंथालय मोठय़ा प्रमाणावर असलेले विविध अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना दिले जाणारे जैवतंत्रज्ञानासारखे विशेष अभ्यासक्रम यांची दखल घेऊन समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाच्या पुढाकारातून आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी केली जाणारी मदत, तसेच दुष्काळग्रस्त २०० विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या मोफत निवास व भोजन सुविधा, अपंग व अंध विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विशेष सुविधा यांची नॅक समितीने विशेष दखल घेतली.
या बरोबरच अध्यापन पद्धती, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनातील प्रगती, कंन्सलटन्सी सव्र्हिसेस यांची समितीने अहवालात नोंद घेतली. रसायनशास्त्र विभागाने कर्करोगावर हिब्रू विद्यापीठ, जेरुसलेम (इस्राईल) येथे केलेल्या संशोधनाची व तसेच या विभागाला भेटलेल्या आंतरराष्ट्रीय पेटंटची दखल घेतली. भूगर्भशास्त्र विभागातर्फे पाणी नियोजन तसेच पाण्याचे पुनर्भरण क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन व शेतकऱ्यांसाठी पुरविलेल्या कन्सलटन्सी कामाची प्रशंसा केली.