राज्य साहित्य संस्कृती मंडळाने महाराष्ट्राचे शिल्पकार योजनेंतर्गत काही चरित्रे प्रकाशित केल्यानंतर आता याच पुस्तकमालेत नानाजी देशमुख यांचे चरित्र या वर्षांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सुमारे १२ वर्षांपूर्वी प्राचार्य रा. रं. बोराडे मंडळाचे अध्यक्ष असताना महाराष्ट्राच्या समाजजीवनावर प्रभाव टाकणाऱ्या विविध क्षेत्रांतील दिवंगत थोर व्यक्तींची चरित्रे प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या जळवळीतील अग्रणी, समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे चरित्र या योजनेत प्रथम प्रकाशित झाले. मराठवाडय़ाच्या जडणघडणीतील स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, भाई उद्धवराव पाटील, शंकरराव चव्हाण, अनंतराव भालेराव आदींची चरित्रे मंडळाने वाचकांना उपलब्ध करून दिल्यानंतर मराठवाडय़ाचे भूमिपुत्र असलेले दिवंगत नानाजी देशमुख यांचे चरित्र प्रकाशित करण्याच्या प्रस्तावास मंडळाने अलीकडेच मंजुरी दिली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी सांगितले.
नवनिर्माण व रचनात्मक कार्यात मानदंड निर्माण करणाऱ्या नानाजी देशमुख यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. जनसंघाचे ते संस्थापक सदस्य होते. आणीबाणीच्या काळात ते जयप्रकाशजींसोबत कृतिशील राहिले. पुढे जनता पक्षाच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते. १९७७ मध्ये लोकसभेवर निवडून आल्यावर केंद्रातील मंत्रिपद नाकारून त्यांनी पक्ष संघटनेत काम केले. वयाची साठी पार केल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून स्वेच्छेने निवृत्ती घेत रचनात्मक कार्यासाठी वाहून घेतले.
दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे अनेक उपक्रम सुरू आहेत. नव्या पिढीला नानाजींच्या विशाल कार्यकर्तृत्वाची महती कळावी, या साठी मंडळाने त्यांचे चरित्र प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, असे भांड यांनी स्पष्ट केले.