22 January 2018

News Flash

नांदेडमध्ये कोण बाजी मारणार ?

नांदेड महापालिकेमध्ये प्रचार झाला तो ‘दलबदलू’ या शब्दाभोवती.

खास प्रतिनिधी, औरंगाबाद | Updated: October 11, 2017 3:31 AM

काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; भाजपला शिवसेनेच्या आमदारांची मदत

‘पक्ष सोडू नका, शिवसेनेमध्येच रहा, पण भाजपचा प्रचार करा,’ असे नवे राजकीय सूत्र मांडून नांदेड महापालिकेमध्ये भाजपने प्रचाराची रणनिती आखली. परिणामी शिवसेनेच्या नेत्यांना स्वत:च्या आमदाराला ‘बेडूक’ अशी उपमा द्यावी लागली. त्यातुनच अशोक चव्हाण यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या अशोक चव्हाण यांचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे. नांदेड महापालिकेमध्ये भाजपकडे या पूर्वी केवळ दोन जागा होत्या. त्या किती वाढतात आणि कोणाच्या वाटय़ाच्या जागा त्यांना मिळवता येतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, प्रचाराच्या निमित्ताने भाजपच्या संपर्कात सेनेचे अनेक आमदार आहेत, हे राजकीय सत्य पुरेसे स्पष्ट झाले आहे. शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांना ढाल करून भाजपने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात सारी शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसची दमछाक झाल्याचे दिसून येत आहे.

नांदेड महापालिकेमध्ये प्रचार झाला तो ‘दलबदलू’ या शब्दाभोवती. शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडे भाजपने स्थानिक पातळीवर प्रचाराची सूत्रे दिली. अशोकरावांना विरोध न करता राजकीय अस्तित्व मिळणार हे माहीत असणारे चिखलीकर पूर्वी काँग्रेसमध्ये होते. तेव्हा ते कट्टर विलासरावांचे समर्थक मानले जायचे. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला. तेव्हाही अशोकरावांचा विरोध हेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र होते. आता ते शिवसेनेचे आमदार आहेत आणि प्रचार करताहेत भाजपचा. निवडणुकीपूर्वी त्यांनी त्यांच्या समर्थकांना भाजपमध्ये पाठविले. पक्षांतर बंदी कायद्यामुळे शिवसेनेमध्ये थांबून त्यांनी भाजपसाठी सारे काही करावे, यास भाजप नेतृत्वाने मान्यता दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षातील अनेकांना निवडणुकीपूर्वी प्रवेश देत महापालिका निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करायचे, असा भाजपचा होरा असल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसकडून आणि शिवसेनेकडून प्रचारामध्ये ‘दलबदलू’ या शब्दाभोवती प्रचार झाला. बेडूक ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी दिलेली उपमा. खरे तर शिवसेनेचे चार आमदार नांदेड मतदारसंघात निवडून आलेले. हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, नागेश पाटील आष्टीकर आणि सुभाष साबणे. या चौघांना बरोबर घेऊन सेनेला महापालिकेची मोट बांधता आली असती. मात्र, संघटना बांधणी करताना नक्की विरोध कोणाला करायचा, हे शेवटपर्यंत ठरले नाही. राजकीय मैदानात सारेच शत्रू असे म्हणून चालत नसते. मित्र म्हणून भाजप जवळचा की अशोक चव्हाण या संभ्रमात शिवसेना राहिली. त्यामुळेच चिखलीकरांनी अशोक चव्हाण विरोधाचे राजकारण भाजपच्या मदतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. असेही नांदेड प्रत्येक निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध जिल्ह्यतील सारे पुढारी हे चित्र वर्षांनुवर्षांचे. सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर यांच्यासह भास्करराव पाटील खतगावकर या नेत्यांना भाजपने झेंडा दिला. शिवसेना फोडली. त्यामुळे अशोक चव्हाण यांचे नेतृत्व जपा, असा संदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना द्यावा लागला. आमदार अमरनाथ राजूरकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ‘आपण आपले नेतृत्व जपू या’ या शीर्षकाखाली काढलेले पत्रक, बरेच बोलके आहे.

नांदेड महापालिका निवडणूक गेल्या वेळी गाजली होती ती ‘एमआयएम’च्या विजयामुळे. तब्बल ११नगरसेवक ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ या पक्षाचे निवडून आले. या पक्षाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. असदोद्दीन ओवेसी, आमदार इम्तियाज जलील गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्ये मुक्कामी आहेत. वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे अकबरोद्दीन ओवेसी यांची सभाही प्रचारापूर्वी झाली. तत्पूर्वी काही भागात प्रचार फेऱ्याही झाल्या. त्यामुळे पुन्हा ‘एमआयएम’ काय होणार, हा प्रश्न राजकीय पटलावर उमटतो. त्यांचा प्रभाव आता ओसरला आहे, असे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे त्यावर उत्तर असते. मात्र, ‘एमआयएम’च्या शहराध्यक्षांना निवडणुकीपूर्वी झालेली अटक त्याचा पक्षाकडून केला गेलेला प्रचार यामुळे मुस्लिमबहुल भागात राजकारण तापले आहे. पण या पक्षाची महापालिका निवडणुकीमध्ये माध्यमांनी मात्र फारशी दखल घेतली नाही. या पक्षाला किती जागा मिळतात, यावर काँग्रेसचे संख्याबळ अवलंबून असणार आहे. गेल्या वेळी नांदेड महापालिकेमध्ये  काँग्रेसच्या ४१ जागा होत्या. त्यातील चार सदस्य फुटून भाजपमध्ये गेले. त्यात माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या मुलाचाही समावेश आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा संभाजीपाटील निलंगेकरांवर टाकण्यात आली होती. लातूर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरही फारसे वातावरण बरे नाही. प्रशासनाबरोबरचे वाद सुरू आहेत. सत्तेच्या जवळ असणारी मंडळीच विरोधकांसारखी वागत आहे. त्यामुळे लातूरमधील ते वातावरण आमदार अमित देशमुख यांनी नांदेड महापालिकेत मांडणे अपेक्षित होते. मात्र, आमदार अमित देशमुख नांदेडला फिरकले नाहीत. चिखलीकरांचा घरोबा त्यास कारणीभूत असावा, असे सांगण्यात येते. काँग्रेसच्या प्रचारासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश होता. मात्र, हिंगोलीचे खासदार राजीव सातव काही प्रचारात सहभागी झाले नाहीत. राज्यभरातून अशोकरावांचे समर्थक आमदारांनी प्रचार केला. पण स्थानिकपातळीवरील अनेक बाबींवर बाहेरुन येऊन निर्णय घेता येत नसतात, हे काँग्रेसच्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे भाजपने कितीही तयारी केली असली तरी काँग्रेस गड सर करणे त्यांना म्हणावे तेवढे सोपे असणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष यांच्या जागा कमी करण्यात भाजपला यश मिळते की, काँग्रेसच्या जागा घटविता येतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

नांदेडमध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि अशोक चव्हाण यांचाच वरचष्मा राहिला आहे. यंदा भाजपने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा पाडाव करायचा हे भाजपचे उद्दिष्ट आहे. यामुळेच भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध सारे, असा सामना झाला होता. सर्व निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण हे विरोधकांना पुरून उरले.

महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण बाजी मारणार की भाजप लातूरप्रमाणे नांदेडमध्ये काँग्रेसचा पराभव करणार याची उत्सुकता आहे.

भाजपची अशीही खेळी

अशोक चव्हाण यांना अडचणीत आणण्याकरिता भाजपने सोमवारी केलेली खेळी भाजपला फायदेशीर ठरते का, हे बघायचे. ‘आदर्श’ घोटाळ्यानंतरही अशोक चव्हाण यांनी नांदेडवरील आपली पकड कायम ठेवली होती. मुंबईतील सदनिकांचे प्रकरण भाजपने बाहेर काढले. पुन्हा एकदा चव्हाणांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा कितपत परिणाम होतो हे निकालानंतरकच कळेल.

८१ जागांसाठी ५७८ उमेदवार

  • नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ८१ प्रभागांमध्ये ५७८ उमेदवार रिंगणात आहेत. चार सदस्यीय १० प्रभाग असून, एका प्रभागात पाच सदस्य निवडून येणार आहेत.
  • प्रभाग क्र. २ मध्ये व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. या प्रभागात मतदान केल्यावर आपण कोणाल मत दिले याची चिठ्ठी मतदारांना बघता येईल.
  • या प्रभागात मतदान यंत्राबरोबरच चिठ्ठय़ांचीही मोजणी केली जाणार आहे. मतमोजणी गुरुवारी होणार आहे.

First Published on October 11, 2017 3:31 am

Web Title: nanded municipal corporation election 2017 ashok chavan congress bjp shiv sena
  1. No Comments.