X

‘राणे हे माझे मित्रच, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझा सल्ला घेतात’

काँग्रेसला मोठा फटका बसेल

नारायण राणे यांनी साथ सोडल्याने राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबादेत मांडले. सिंधुदुर्ग जिल्हयात राणे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. नारायण राणे जुने मित्र असल्यामुळे राजकीय निर्णय घेताना ते माझ्याशी चर्चा करतात असेही ते म्हणाले.

शेतकरी कर्जमाफी, वाढती महागाई या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार विरोधात आंदोलन छेडणार आहे. या आंदोलनाची नेमकी दिशा ठरवण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी किसान सेलची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरेंनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी तटकरे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सरकारच्या दिंरगाईमुळेच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारने शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर केली. तीन महिन्यानंतरही या योजनेच्या लाभार्थी संदर्भातील माहिती दिली जात नाही. ज्यावेळी शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील, त्यावेळी सरकारची योजना फसवी असल्याचे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

कर्जमाफी करण्याची सरकारची मानसिकता नव्हती. मात्र शेतकरी आणि राष्ट्रवादीच्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडले. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर अंमलबजावणी करण्याऐवजी सत्ताधारी पक्षातील मंत्री शेतकऱ्यांना बोगस म्हणून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असे सांगत त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना बोगस म्हणणारी प्रवृत्ती घातक आहे. ऑनलाइन सातबारा असताना त्यांना बोगस कसं म्हणू शकता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ही सत्तेची गुर्मी आहे. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी तटकरे यांनी यावेळी केली. औरंगाबदेत ५ नोव्हेबरला किसान सेलच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सरकार विरोधी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: October 4, 2017 9:56 pm
Outbrain