नाशिक जिल्हय़ातील काही स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरत होते, मात्र असा कोणताही विचार नाही. नाशिक हा पर्याय असू शकत नाही. मला कसे निवडून आणायचे हा विषय मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याचे अन्यही अनेक पर्याय आहेत, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

सत्तेत नारायण राणे यांना सहभागी करून घेतले तर सरकार पडेल, अशी शंका भाजपमधील नेत्यांना आहे. ती पूर्णत: चुकीची आहे. तसे मुख्यमंत्र्यांनाही पटवून दिले आहे, मात्र या अनुषंगाने मांडलेले गणित स्वत: पंतप्रधानांना सांगण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडय़ाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने या भागात आक्रोश आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्नही रेंगाळलेला आहे. त्यामुळे या भागात पक्षाच्या वाढीला अधिक वाव असल्याचेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरात राणे यांची जाहीर सभाही होणार आहे. सेनेच्या मराठवाडय़ातील नेत्यांच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी अधिकारपदावरील एकाही व्यक्तीने संपर्क साधला नव्हता, असेही राणे म्हणाले.  ‘जे बोलू ते करू’ असे आपल्या पक्षाचे घोषवाक्य असेल, असेही त्यांनी सांगितले.