News Flash

सचिन अंदुरेच्या मेहुण्यांसह तिघांचा जामीन फेटाळला

शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केलेल्या सचिन अंदुरे याचे दोन मेहुणे व अन्य एक, अशा तिघांचा जामीन अर्ज मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी फेटाळला. या तिघांवर पिस्तूल, काडतुसे आदी शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी नवी मुंबईच्या सीबीआय विभागाचे उपअधीक्षक मारुती पाटील यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात २१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सचिन अंदुरेचा सख्खा मेहुणा शुभम सूर्यकांत सुरळे, त्याचा चुलत भाऊ अजिंक्य शशिकांत सुरळे व त्याचा मित्र रोहित राजेश रेगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपअधीक्षक मारुती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन अंदुरे याने त्याच्याजवळील पिस्तूल व इतर साहित्य हे मेहुणा शुभम सुरळे याच्याकडे सुरक्षितरीत्या ठेवण्यासाठी दिले होते. शुभमने त्याचा चुलत भाऊ अजिंक्य याच्याकडे ते सोपवले. अजिंक्यने शस्त्रास्त्रांची पिशवी  धावणी मोहल्ल्यात राहणारा त्याचा मित्र रोहित रेगे याच्याकडे असल्याचे सीबीआयच्या पथकाला सांगितले. त्यावरून रोहित याच्या घरात मारलेल्या छाप्यात पिस्तूल, काडतुसे यासह एक रिकामी गोणी, दोन मोबाईल, एक तलवार आदी साहित्य बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे समोर आले होते.

तिघांनाही मंगळवारी पुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सहायक सरकारी वकील ढोकरट यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. या प्रकरणी आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा तपास करावयाचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2018 1:15 am

Web Title: narendra dabholkar murder case 4
Next Stories
1 सीबीआय, एटीएसचे पथक मराठवाडय़ात तळ ठोकून!
2 राष्ट्रवादीच्या ‘जंबो’ कार्यकारिणीत महिलांना नगण्य स्थान
3 सचिन आजरी ; प्राणी संग्रालयातील पांढऱ्या वाघाने सोडले अन्न
Just Now!
X