मराठवाडय़ात शुकशुकाट!

औरंगाबाद :  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला मराठवाडय़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद येथे सकाळच्या वेळी कार्यकर्त्यांनी दुचाकी फेरी काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्याला दुपापर्यंत प्रतिसाद होता. सकाळी पंचवटी चौकात शहर वाहतूक बसवर, तर गेवराई तांडा येथे महामंडळाच्या औरंगाबाद-पैठण बसवर दगडफेक करण्यात आली. अन्यत्र बंद शांततेत होता. वंचित बहुजनचे नेते अमित भुईगळ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११च्या सुमारास शहरातील औरंगपुरा, गुलमंडी भागात दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनीही तातडीने दुकाने बंद केली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वर्गही कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनानंतर बंद करण्यात आले. चौकाचौकांत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

लातूर : लातूर व जिल्ह्य़ातील औसा, निलंगा, रेणापूर, उदगीर, देवणी, अहमदपूर तालुक्यात बंदला अंशत: प्रतिसाद मिळाला. लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे गेल्या दोन दिवसांपासून दिवस-रात्र धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात डॉक्टर, वकील व विविध विभागातील लोक आपला सहभाग नोंदवत आहेत. केंद्र सरकारने हा कायदा लागू करून लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विरोधात तीन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. वैद्यकीय सेवा, रिक्षा, शाळा, महाविद्यालये नियमित सुरू होती. जिल्हय़ातील निलंगा, औसा, उदगीर, रेणापूर, देवणी, मुरूड, पानगाव, खरोळा, शिरूर ताजबंद, चाकूर, जळकोट, अहमदपूर या ठिकाणीही बंदला कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मुस्लीम समाजाचे व्यवसाय पूर्णपणे बंद होते. भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनी आपला व्यवसाय बंद ठेवला होता.

उस्मानाबाद – उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद होत्या. मोठय़ा संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकत्रे आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी रस्त्यावर उतरले होते. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. शहरातील प्रमुख महामार्गावर शुकशुकाट होता. दरम्यान सकाळी ११वाजेच्या सुमारास मुख्य बस स्थानकातून बसगाडय़ा बाहेर सोडण्यात आल्या नव्हत्या. बंदच्या घोषणेमुळे दुपारी तीन वाजेपर्यंत बस स्थानक आणि परिसरातदेखील शुकशुकाट पसरला होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास सर्व बसगाड्या मार्गस्थ करण्यात आल्या.

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यतील तालुक्यांत बंद पाळण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चौका-चौकात पोलिसांचा मोठा  बंदोबस्त होता. सकाळी १० वाजता राज कॉर्नर येथून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. बंदमुळे नांदेडातील शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणी वर्गासह अभ्यासिकाही बंद ठेवण्यात आल्या.

रॅली दरम्यान बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार द्या, एनआरसी, एनपीआर कायदा रद्द करण्यात यावा, भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर वंचित बहुजन आघाडीसह घटकपक्षाच्या नेत्यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले.  बंदमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बस बंद ठेवण्यात आल्या होत्या.

बीड : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख बाजारपेठा सकाळपासूनच बंद होत्या. ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदन देऊन घटनाविरोधी कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला. शहरातील बशिरगंज भागात बंदचे आवाहन करत फिरत असताना वंचितचे अशोक िहगे, बबन वडमारे, वैभव स्वामी, एमआयएमचे शेख निजाम यांच्यासह १८ ते २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना दिवसभर शहर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते. शहरातील सुभाष रस्ता, क्रीडा संकुल परिसर, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, राजुरीवेस, बशीरगंज, बालेपीर, नगर रस्ता, मोमीनपुरा, इस्लामपुरा आदी भागांमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. परळीमध्ये बाजारपेठेसह शाळा, महाविद्यालये बंद होती.

रेल्वेस्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली काढण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्य़ात सर्वत्र बंद पाळण्यात आला होता.

परभणी : परभणी शहरासह जिल्ह्यतील जिंतूर, सेलू, पुर्णा, मानवत, पाथरी, पालम, गंगाखेड आदी तालुक्याच्या ठिकाणीही व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला. बंदच्या पाश्र्वभूमीवर सकाळच्या सुमारास लांब पल्ल्याच्या बस सोडल्यानंतर एस.टी.महामंडळाने काही बसफेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. बंददरम्यान जिल्ह्यत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शहरातील शिवाजी चौकात शुक्रवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकत्रे एकत्र झाले. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध परिसरात रॅली काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. बंदच्या पाश्र्वभूमीवर शिवाजी चौक ते शनिवार बाजार, सुभाषरोड, शिवाजी रोड, गुजरी बाजार, क्रांती चौक, स्टेशनरोड या प्रमुख बाजारपेठेसह वसमत रोडवरील दुकाने सकाळपासूनच बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता.