महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात ‘आई राजा उदो उदो, सदा आनंदीचा उदो उदो’च्या जयघोषात हजारो भक्तांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. सवाद्य घटाच्या मिरवणुकीतील अंगारा व घटातील धान्य घेतल्यानंतर हजारो कुटुंबांमध्येही घटस्थापना करण्यात आली. मंदिरात केलेल्या नव्या मार्गातून भक्तांना आत सोडल्याने काही काळ पुजारी व व्यापारी वर्गात संताप व्यक्त करण्यात आला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व त्यांची पत्नी प्रियांका यांनी घटस्थापनेसाठी यजमान म्हणून जबाबदारी पार पाडली. तुळजाभवानीची ४ ऑक्टोबरला चालू केलेली मंचकी निद्रा सोमवारी पूर्ण झाल्यानंतर विधिवत मध्यरात्री देवीच्या मूर्तीची प्रतिस्थापना पुजारी बांधवांकडून करण्यात आली. सकाळी दही व दुधाचे अभिषेक पार पडल्यांनतर ११ वाजता घटाची मिरवणूक काढण्यात आली. संबळाच्या निनादात ‘आई राजा’च्या जयघोषात पुजारी बाळकृष्ण कदम यांनी हाती अंगारा घेऊन, घटाचे मानकरी यांनी घट डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली.
महंत तुकोजी बुआ, महंत चिलोजी बुआ, पाळीचे पुजारी बाळकृष्ण कदम, नगराध्यक्षा जयश्री विजय कंदले, तहसीलदार सुजित नरहिरे, व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, प्रा. संभाजी भोसले, उपाध्ये मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ प्रयाग आदी उपस्थित होते.
सोमवारी दुपारपासून राज्याच्या विविध भागातून आलेल्या नवरात्र मंडळाच्या सुमारे दोन लाखांवर तरुणांनी भवानीज्योत भवानीमातेच्या गाभाऱ्यातील नंदादीप प्रज्वलित करून आपल्या गावाकडे वाजतगाजत प्रस्थान ठेवले. या काळात राज्य मार्गावरील वाहतुकीवर बंधने आणली होती. या काळात कुंभार गल्लीतील नव्याने विकसित केलेल्या मार्गावरून भक्तांना मंदिरात सोडण्यात आले. त्यामुळे काही व्यापारी वर्गानी दुकाने बंद करुन नाराजी व्यक्त केली.
राजे शहाजी महाद्वारासमोर शुकशुकाट
घटस्थापनेच्या दिवशी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजे शहाजी महाद्वारासमोर शुकशुकाट होता. महाद्वार बंद करून दर्शन मार्गात बदल केल्यामुळे देशभरातून आलेल्या भाविकांनी संताप व्यक्त केला. परिसरातील व्यापाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. दर्शनमार्गात बदल केल्यामुळे पोत ओवाळणे, परडी भरणे, तेल ओतणे असे अनेक कुलाचार करण्यापासून भाविक वंचित राहिले, तसेच दर्शन मार्गातील बदलामुळे भाविकांना यंदा कळस दर्शनाचा योग येणार नाही.
एक किलो सोन्याचा मुकुट
पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मातेच्या चरणी एक किलो सोने आणि एक किलो चांदी अर्पण करण्यात आली. कर्नाटकच्या लक्ष्मीपुरा गावातील भाविकांनी लोकवर्गणी जमा करून तुळजाभवानी मातेस एक किलो १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट व एक किलो चांदीची छत्री तुळजापूर शहरातून मिरवणूक काढून अर्पण केली. कर्नाटकचे कामगारमंत्री पी. टी. परमेश नाईक यांच्यासह लक्ष्मीपुरा येथील १२५ भाविक सोमवारी तुळजापुरात दाखल झाले. पूजेचे साहित्य, देवीस अर्पण करण्यास आणलेला सोन्याचा मुकुट, चांदीची छत्री, कर्नाटकचे महावस्त्र असलेल्या दहा भरजरी साडय़ा अर्पण केल्या. दर्शन रांगेत बदल केल्यामुळे मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारावर कामगारमंत्री नाईक यांची मंदिरात सोडण्यावरून तेथे तनात पोलीस अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. अखेर १० मिनिटांनी मंत्र्यांना सहकाऱ्यांसह प्रवेश दिला.