काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाली आणि काँग्रेसच्या मंडळींनी संघटनात्मक बांधणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीने तुळजापूरमधून ‘हल्लाबोल’ आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाडय़ात सुरू केला आहे. विस्कळीत झालेल्या संघटात्मक बांधणीला सावरायचे कसे, याचे निरनिराळे प्रयोग मराठवाडय़ात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू आहेत. तुलनेने औरंगाबाद वगळता शिवसेनेची तयारी मात्र फारशी दिसत नाही. मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांत काँग्रेसचे संघटन कमकुवत आहे. तर काही मतदारसंघांत राष्ट्रवादी दिसत नाही. त्यामुळे अशा कुपोषित वाढ झालेल्या कार्यकर्त्यांना कोणते जीवनसत्त्व दिले जाणार यावर अगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आडाखे ठरणार आहेत.

बीड जिल्ह्य़ात काँग्रेसचा कार्यकर्ता तसा शोधूनही सापडत नाही. रजनीताई पाटील यांच्यासारख्या नेत्या मात्र आहेत. अशीच अवस्था शिवसेनेची. त्यामुळे बीड जिल्ह्य़ात भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांची लढतीमध्ये नवे काही होण्याची शक्यता दिसत नाही. औरंगाबादसारख्या ज्ल्ह्य़िातही काँग्रेसला जिल्हाध्यक्ष ठरविता आलेला नाही. सध्या जिल्हाध्यक्षपदाचा कारभार अब्दुल सत्तार यांच्याकडे असला तरी ते या पदावर खूश नव्हते. संघटनात्मक घसरणीच्या काळात वरिष्ठ नेते साथ देत नसल्याचे कारण देत त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. संघटना दुसऱ्याने बांधावी, मुद्दे लोकांनी निर्माण करून द्यावेत आणि आपण फक्त उमेदवारी मिळवावी, अशी मानसिकता असणारे बहुतांश नेते औरंगाबाद शहरात आहेत. ‘लोकमता’चा रेटा आपल्या बाजूने करण्यासाठी जंगी वाढदिवसाचे कार्यक्रम झाल्यानंतर राजेंद्र दर्डा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू  झाली. प्रदेशाध्यक्षपदी अशोकरावांच्या नियुक्तीनंतर तर या चर्चेला अधिक बळ मिळत असल्याचे काँग्रेसमधून सांगितले जात आहे.

एमआयएमची नांदेडमध्ये घसरण झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले तरी काही मतदारसंघात काँग्रेसला अजून पुरेसा शिरकावही करता आलेला नाही. त्यात बीड जिल्ह्य़ाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अशीच स्थिती राष्ट्रवादीची लातूर जिल्ह्य़ात आहे. त्यामुळे प्रशिक्षण शिबीर आणि हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसला कितीसे उपयोगी पडतील, हे त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनावरही अवलंबून आहे. काँग्रेसच्या प्रशिक्षण वर्गामध्ये नक्की कोणत्या नव्या बाबींवर चर्चा होईल, याची माहिती अद्यापि जिल्हास्तरावरील नेत्यांना माहीत नाही. तसेच कोणत्या मुद्दय़ावर कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी हल्लाबोल करणार याचेही सूत्र ठरलेले दिसत नाही. शक्य त्या सर्व विषयांवर टीका करा, असा संदेश देत कृषी समस्यांवर भर देत हल्लाबोल होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये प्रत्येक जिल्ह्य़ात गटबाजी असल्याने ती मिटविण्यासाठी नेत्यांना खासे कष्ट घ्यावे लागणार आहेत. पुढील आठवडाभर राष्ट्रवादीचे नेते मराठवाडय़ात असल्याने राजकीय मशागतीला  सुरुवात झाली आहे.

मरगळ झटकून काँग्रेस कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करण्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यभर परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे. मराठवाडय़ात वातावरण तापविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडय़ातील नांदेड आणि हिंगोली या लोकसभेच्या दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. या वेळी चांगली कामगिरी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशा दोन्ही बाजूंच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची भावना आहे.