विक्रम काळे, सतीश पत्की यांचे मिरवणुकीने अर्ज; शिवसेनाही रिंगणात

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मंगळवारी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना चार चाकी गाडय़ांची रांगच प्रचारयात्रेत लावली. भाजपचे उमेदवार सतीश पत्कींच्या समर्थनार्थ मराठवाडय़ातील सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावत उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून ऐनवेळी शिवसेनेकडूनही उमेदवारीची घोषणा करण्यात आली. प्रा. गोविंद काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, राज्यातील सर्व निवडणुकीमध्ये युतीबाबतच्या निर्णयासाठी मुंबई येथे बैठक होणार असल्याने काळे यांचा अर्ज टिकणार की मागे घेतला जाणार हे युतीच्या निर्णयावर अवलंबून असेल. दरम्यान आघाडीचे उमेदवार म्हणून विक्रम काळे यांनी अर्ज दाखल केला असला तरी काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष कालिदास माने यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने आघाडीत बिघाडी आणि युतीमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी क्रांती चौकातून मिरवणूक काढली. त्यांचे हे शक्तिप्रदर्शन संपते न संपते तोच भाजपच्या कार्यकर्त्यांनी चौकात गर्दी करण्यास सुरुवात केली.  पण भाजपचे शक्तिप्रदर्शन मंत्र्यांच्या भोवती केंद्रीत होते. या मतदारसंघाचे क्षेत्र संपूर्ण मराठवाडा असल्याने विभागातील सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पत्कींनी अर्ज भरला.  मात्र, पदवीधर मतदारसंघात जनसंपर्क असणारे माजी आमदार श्रीकांत जोशी आणि जयसिंगराव गायकवाड यांच्या अनुपस्थितीची चर्चा भाजपच्या गोटात होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही सर्व नेत्यांनी हजेरी लावली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. विशेष म्हणजे पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार कल्याण काळे यांनीही हजेरी लावली होती. शक्तिप्रदर्शनानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सभा घेतल्या. भाजपच्या सभेत सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर टीका केली. औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी शिक्षक मोर्चात गुंड पाठवून मोर्चाला गालबोट लावणाऱ्यांमध्ये आमदार विक्रम काळे यांचा हात होता, असा आरोपही करण्यात आला.  दिवसभरात प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच काही शिक्षक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही अर्ज दाखल केले. यामध्ये व्ही. जी. पवार, विक्रम विठ्ठल मोरे यांचा समावेश होता. काँग्रसने जरी विक्रम काळे यांना जाहीर पाठिंबा दिला असला तरी लातूर जिल्हय़ातील काँग्रेसचे कार्यकर्ते कालिदास माने यांनी शिक्षक समन्वय समितीच्या वतीने अर्ज दाखल केला. निवृत्त शिक्षक संचालक दिलीप सहस्रबुद्धे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.